मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलचा पहिला सिझन आपल्या नावावर करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची या सिझनमधील कामगिरी काही खास राहिली नाही. या टीमचे नेतृत्त्व संजू सॅमसन करत आहे. सध्या हि टीम गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. राजस्थानने आतापर्यंत ४ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे. या आयपीएलमध्ये राजस्थानने लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर ख्रिस मॉरीसला १६. २५ कोटींमध्ये खरेदी केले होते.आतापर्यंत आयपीएलच्या लिलावात ख्रिस मॉरीस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मात्र ख्रिस मॉरीस हा १६ कोटींच्या पात्रतेचा नाही असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याने व्यक्त केले आहे.
काय म्हणाला केव्हिन पीटरसन
” ख्रिस मॉरीस दक्षिण आफ्रिकेच्या टीमची पहिली पसंती नाही. त्याच्याकडून सर्वांच्या जास्त अपेक्षा आहेत. त्याच्याबद्दल खूप काही सांगितलं जात आहे, पण माझ्या मते तो सतत चांगली कामगिरी करु शकणारा खेळाडू नाही. त्याच्यात काहीही खास नाही. तो फक्त दोन मॅच चांगल्या खेळू शकतो, त्यानंतर पुढच्या मॅचमध्ये त्याची कामगिरी खराब असेल.” असे मत केव्हिन पीटरसन याने एका वृत्त वहिनीला दिलेल्या मुलखातीत मांडले आहे. केव्हिन पीटरसन एवढेच बोलून थांबला नाही तर “राजस्थानने मॉरीससाठी जास्तच पैसा खर्च केला. हे थोडं खराब वाटेल, पण माझ्या मते तो इतक्या पैशांसाठी पात्र नाही.” असेसुद्धा बोलला आहे.
आरसीबी विरुद्ध मॉरीस फेल
ख्रिस मॉरीसने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धची मॅच सोडली तर बाकी सगळ्याच सामन्यात निराशा केली आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात तो फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला. या सामन्यात ख्रिस मॉरीस ७ चेंडूत १० रन करून बाद झाला तर त्याने ३ ओव्हरमध्ये १२.६६ च्या इकॉनॉमी रेटने ३८ धावा दिल्या. आरसीबी विरुद्ध त्याला एकसुद्धा विकेट मिळाली नव्हती. हा सामना आरसीबीने देवदत्त पडिक्कल (१०१) आणि विराट कोहली (७२) या दोघांच्या फलंदाजीने एकही विकेट न गमावता जिंकला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती.