हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर अश्विननंतर आता भारताचा माजी गोलंदाज आर पी सिंग यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर पी सिंग याच्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याने माघार घेतली आहे. आर पी सिंग आयपीएल २०२१ मध्ये समालोचक म्हणून काम पाहत आहे.
आर पी सिंग याने २०१८मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो अनेक चॅनेलवर समालोचक म्हणून काम करतो. आयपीएल २०२१साठी स्टार स्पोर्ट्सने त्याला हिंदी समालोचक पॅनलसाठी करारबद्ध केले होते. हे सर्व बायो बबलमध्ये राहत होते. वडिलांची प्रकृती सुधारल्यानंतर तो पुन्हा आयपीएलच्या बायो बबलमध्ये परतणार आहे असेदेखील आर पी सिंग याने म्हणले आहे. हिंदी समालोचकाच्या पॅनेलमध्ये आकाश चोप्रा, निखिल चोप्रा, अजित आगरकर, इऱफान पठाण, पार्थिव पटेल, गौतम गंभीर, सुनील गावस्कर आणि दीप दासगुप्ता यांचा समावेश आहे.
धोनीच्या आई-वडिलांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली, रुग्णालयातून डिस्चार्ज
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या आईवडिलांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांना मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. धोनीचे वडील पान सिंग आणि आई देवकी यांना २१ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांनाही सौम्य लक्षणं असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.