हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे-फडणवीसांचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. 18 मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मात्र, अद्यापही त्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोंधळले असून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केले असते तर योग्य झाले असते, असे पाटील यांनी म्हंटले आहे.
जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील इतर राज्यांशी स्पर्धा करणारे राज्य आहे. अशा राजकीय गोंधळामुळे राज्याची प्रगती खुंटत आहे. सरकार स्थापनेच्याच गडबडीत अडकले असल्यामुळे राज्याच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत भाजपने असा निर्णय का घेतला हे कळण्यापलीकडे असल्याचेही पाटील म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्याप मंत्रिमंडळातील शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले नसल्याने राज्याचे नुकसान होत असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. याला मुख्यमंत्री शिंदे किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस काय? उत्तर देणार हे पहावे लागेल.