कालिचरण विरुद्ध अखेर गुन्हा दाखल; जितेंद्र आव्हाड स्वत: पोलिस स्टेशनमध्ये

ठाणे | चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्याविरुद्ध आता ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कालोचरण यांच्याविरोधात FIR दाखल केली आहे. याबाबत आव्हाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

“फॅसिजम विरुद्ध मैदानात उतरून लढावच लागेल. गोडसेच्या पाठीराख्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अद्दल घडवावी लागेल. मी स्वतः दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक न ठेवता कालीचरण बाबा विरुद्ध नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे गुन्हा नोंदवायला चाललो आहे. ही विचारांची लढाई आहे,” असं ट्विट करुन आव्हाड यांनी काकिचरण यांच्या विरोधात पाऊल टाकलं आहे.

 

दरम्यान, कालिचरण विरुद्ध सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व अध्यक्ष आनंद परांजपे यांना घेऊन नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला, अशी माहिती आव्हाड यांनी दिली आहे. कालिचरण यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही पहायला मिळाले होते.

या अगोदर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध पुण्यातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुण्यातील नातूबागेत 19 डिसेंबरला समस्त हिंदू आघाडीच्यावतीने अफझलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. यावेळी कालीचरण महाराज, मिलींद एकबोटे आणि इतरांनी समाजामधे तेढ निर्माण होईल, अशी भाषणे केली. त्याची व्हिडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर पोलीसांनी त्याची दखल घेतली आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.