ठाणे । गरजुंना मदत पुरवताना कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीस्वतः होम क्वारन्टाइन करून घेतलं आहे. त्यानंतर सतत फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून जनतेला धीर देणारे आव्हाड यांनी मात्र आज एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी आपल्या भावनांना मोकळी वात करून दिली आहे.
जगाला माहीत नसलेला जितेंद्र आव्हाड दाखवण्याची मला सवय ही नव्हती. पण एक व्हिलन जितेंद्र आव्हाड दाखवण्याचं काम गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जणांनी यशस्वीरित्या करुन दाखवलं. म्हणून तुमची माफी मागतो मला माफ करा, अशा शब्दांत आव्हाडांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मला माफ करा मी हरलो…@supriya_sule @PawarSpeaks@AUThackeray @Jayant_R_Patilhttps://t.co/aMyE5rMi6u
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 15, 2020
जितेंद्र आव्हाड यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट –
मला माफ करा…
मी हरलो…
Covid 19 चा गोंधळ हा साधारणत: 8-10 मार्चनंतर सुरु झाला. मी तेव्हाही माझ्या खात्याच्या मिटींगमधून गोरगरीब जनतेचे एस.आर.ए. चे प्रश्न सोडविण्यात मग्न होतो. माझे कर्मचारी तेव्हाही मला सांगायचे साहेब स्वत:च्या तब्येतीची काळजी घ्या. नका पुढे जाऊ. पण, गोर गरीबांसाठी काम केल पाहिजे ही साहेबांची असलेली शिकवण आणि थोडासा माझ्यातला अतिशहाणपणा… आणि मी काम करतच राहीलो. लॉकडाऊन पर्यंत मी काम करतच होतो. लॉकडाऊन नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली कि सगळ्या व्यवस्था कोलमडल्या. लोकांना बाहेर पडणे कठीण झाले. मग आता या लढाईत काय करायचं.
एक तरुणांची फळी जी गेले 30-40 वर्षे माझ्या बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आलेली पिढी यांना सगळ्यांना एकत्र घेऊन मी निर्णय घेतला कि आपण काहीतरी चालू करुया. मित्र परिवाराला जमा केलं. 50 हजार किलो तांदूळ, 20 हजार किलो डाळ, 1 हजार किलो मिर्ची इ. साहित्य आणून 15 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु केले. प्रत्येक ठिकाणी 15-15 जबाबदार लोकांना नेमण्यात आलं. कळव्यासाठी वागळे इस्टेट येथील एका किचनमधून 15 हजार बंद पाकिटे मागविण्याचा निर्णय झाला. साधारण दिवसभरामध्ये सकाळ-संध्याकाळ 80 हजार लोकांना पाकिटे वाटली जायची. कळव्या-मुंब्र्यामध्येच नाही तर दिवा, घणसोली, ऐरोली, भिवंडी इथून सुद्धा पाकिटे घ्यायला लोक यायची. अर्थात गरिबीला जात, धर्म, पंथ, प्रांत काही नसतो हे माहित असलेला मी कार्यकर्ता असल्यामुळे याची कधी चिंता केली नाही. खिचडी बनत गेली आम्ही वाटत गेलो.
एक काळ असा आला अचानक कळायला लागल कि डॉक्टरांनी आपले दवाखानेच बंद केले. लोकांच्या तक्रारी यायला लागल्या कि आम्ही साध्या-साध्या आजारासाठी काय करायचं. परत हा मोठा प्रश्न निर्माण झाला. सगळ्या डॉक्टरांची एकत्रित बैठक घेतली. पोलीसांनी देखील चांगले सहकार्य केले. कळव्यामध्ये ही बैठक झाली आणि कळव्यामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील 9 कम्युनिटी क्लिनीक सुरु झाले. डॉक्टरांनी स्वत:च्या हिमतीवर Risk घेत, आम्ही लढू असे म्हणत हे कम्युनिटी हेल्थ केअर क्लिनिक सुरु केले. कालपर्यंत हे हेल्थ केअर क्लिनिक चालू होते. आतापर्यंत ह्या हेल्थ केअर क्लिनिकच्या माध्यमातून कळव्यामधील जवळ-जवळ 10 हजार पेशंट्स तपासले गेले. हे सगळे पेशंट्सना साध्या-साध्या आजाराने आजारी होते. त्यांना कळव्यात डॉक्टरच मिळाले नसते. कारण सगळ्याच डॉक्टरांनी आप-आपली क्लिनीक बंद करुन टाकली होती. मुंब्र्यामध्ये एक फक्त कोरोना केअर सेंटर सुरु केलं. जास्त सर्दी, खोकला, ताप असेल तर तुम्ही ह्या सेंटरला भेट द्या. त्यानंतरचा उपचार आणि पुढचा मार्ग काय तो आम्ही तुम्हांला दाखवू.
मध्यंतरीच्या काळामध्ये अँम्ब्युलन्सच्या अडचणी सुरु झाल्या. मागच्या 8 दिवसांपूर्वी अँम्ब्युलन्स वाढवल्या गेल्या. आणि आज जवळ-जवळ मुंब्रा-कळव्यामध्ये 8 अँम्ब्युलन्स कार्यरत आहेत. सर्वांपर्यंत तर मी पोहचू शकलो नाही. पण, जास्तीत-जास्त गोरगरीबांची पोट भरली पाहीजेत. कोणिही माझ्या मतदारसंघात उपाशी राहता कामा नये हा ध्यास ठेवून मी कामाला लागलो. कळव्यामधील माझा सहकारी मित्र मिलींद पाटील त्यांच्याबरोबर महेश साळवी, अरविंद मोरे, राजू शिंदे, मुंब्र्यामध्ये शमीम खान, शानू पठाण, धनंजय गोसावी, बबलू शेमना, युनूस शेख, रेहान पितलवाला, डॉ. मुमताज शाह हे देखील कामाला लागले होते. प्रत्येक जण आप-आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडत होते. ठाण्यामध्ये जवळ-जवळ 50 हजार कुटुंबीयांना स्वस्तात कांदे बटाटे तसेच गोरगरीबांना मोफत कांदे-बटाटे वाटण्याचे काम आनंद परांजपे आणि त्यांच्या ठाण्यातील नितीन पाटील, समीर पेंढारे, सुमित गुप्ता, रत्नेश दुबे, सचिन पंधारे, दिपक पाटील, संकेत नारणे, विशाल खामकर, रोहीत भंडारे, महेश भाग्यवंत, निलेश फडतरे, लखबीर सिंग गिल, गौतम मोरे, कौस्तुभ धुमाळ टिमने केलं. यामध्ये व्यक्तीगत स्वार्थ किंवा व्यक्तीगत पैसे कमविण्याचा उद्देश नव्हता. तर लोकांना वाढत्या महागाईत आणि आता भासत असलेल्या चणचणीच्या परिस्थितीमध्ये आपण आवश्यक गोष्टींचा पुरवठा करत आहोत आणि चांगले काम करत आहोत ही भावना मनात होती.
ह्या सगळ्या बाबतीत साहेब आमचे कौतुक करत होते. कारण साहेबांचा आदर्श घेऊनच आम्ही काम करत होतो. 1972 चा दुष्काळ असो.., 1993 चा बॉम्बस्फोट असो किंवा 1993 चा खिल्लारीचा भूकंप असो.., कुठलेही संकट असो साहेबांनी मैदानात उतरुन काम केले आहे. खिल्लारीचा भूकंप झाल्यानंतर अर्ध्या तासात तिथे पोहचणारे सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब हे 4 महिने घरी आलेच नाहीत, तिथेच राहीले. आणि अख्खे गाव पुन्हा उभे केले. हा इतिहास डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जनसेवा करायची एक संधी आली आहे असे मनात ठेवून, आपल्या घर संसारावरती जवळ-जवळ पाणी सोडत आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलो. माझी स्वत:ची पत्नी ही दिवसातून सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 3 तास कळवा-मुंब्र्याच्या संपूर्ण परिसरामध्ये एकटी फिरत होती. त्याचे परिणाम काय झाले. अचानक एके दिवशी आमच्या जवळच्या व्यक्तीला जो दररोज आम्हांला भेटायचा. त्याचे नाव मला इथे घ्यायचे नाहीये. त्याला ह्या रोगाची लागण झाली असे मला कळले. म्हणून कोणाशीही चर्चा न-करता एक सामाजिक जबाबदारी या नात्याने माझ्या आजूबाजूच्या, माझ्या नोकरांच्या, नातेवाईकांच्या सगळ्यांच्याच टेस्ट मी करुन घेतल्या. जवळ-जवळ 120 मी टेस्ट करुन घेतल्या. आणि त्याच्यामधील नेमके काही जण पॉझिटीव्ह सापडले.
आता हे asymptomatic पॉझिटीव्ह आहेत याच्यावरती मला चर्चा करायची नाही. त्यांना कुठलिही लक्षण नसताना मी त्यांची टेस्ट केली ही माझी चूक आहे असे मला वाटत नाही. कारण मी चुकलेलोच नाही. त्यांची जी टेस्ट केली त्यामुळे ते पुढच्या 4 दिवसात बरे होतील. पण, जे माझ्यावरती बोट उचलत आहेत त्यांच्यासाठी… ही माझी माणूसकी होती कि मी ही टेस्ट करुन घेतली. महाराष्ट्रात किती जणांनी अशा आपल्या शेजा-यांच्या टेस्ट करुन घेतल्या आहेत त्यांनी बोट वरती करुन सांगाव.
त्याच्या अधे-मधे अनंत करमुसेचे प्रकरण झाले. करमुसेने केल ते एकदम बरोबर केलं. माझे अर्धनग्न चित्र फेसबुकवर टाकलं. 2017 सालच्या पोस्टमध्ये तो सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांना शरदुद्दीन म्हणतोय. एकदम चांगल काम करत होता. सगळ्यांच्या समोर व्हिलन जितेंद्र आव्हाड. मला समजत नाही कि सगळ्यांना मी एवढा का खूपतो. त्याने माझे अर्धनग्न चित्र टाकलय ते चुकीच आहे अस म्हणायची हिम्मत कुणीच दाखवली नाही. किंवा त्यानंतर माझ्या पत्नीवर आणि मुलीवर बलात्कार करण्याच्या ज्यांनी धमक्या दिल्या त्याबद्दल कुणीच अवाक्षरही काढले नाही. ना त्यांना कोणी अटक केली, ना त्यांच्यावरती कारवाया झाल्या. आजही करमुसे हा त्याचे फेसबुक अकाउंट पोलीसांना उघडूच देत नाहीये. असो.., तो पोलीसी तपासाचा भाग आहे आणि याबाबत मला काही बोलायचे देखील नाही. पण, आज जेव्हा सगळी माध्यमं बोट जितेंद्र आव्हाडकडे दाखवत आहेत तेव्हा मात्र माझ मन हरल्यासारख झाल आहे.
मी चूक काय केली 80 हजार लोकांना खिचडी वाटली. त्यांच्यासाठी दारोदारी फिरुन त्यांना शांत करणे, त्यांना तुम्ही घरी जा, घरात बसा म्हणून सांगणे, संध्याकाळी रात्री ज्या वस्तीत लोक ऐकत नाही त्यांना पोलीसांसोबत जाऊन सांगणे आणि त्यानंतर ती वस्ती शांत होणे. ही माझी चूक होती का ? 10 हजार लोकांना औषध पुरवणे ही माझी चूक होती का. म्हणजे एखाद्या युद्धामध्ये आपण काम करत असताना त्याची काहीतरी किंमत मोजावी लागते ही गोष्ट खरी आहे. पण, त्याची किंमत इतकी मोठी मोजावी लागते कि आज माझे घर देखील माझ्याबरोबर राहीले नाही. घरातला प्रत्येकजण हा मलाच दोष देतोय. कि, तुला कोणी सांगितलेले हुशा-या करायला. पण, उपाशी पोटी झोपलेला माझा गरीब नागरीक जाती-धर्माचा विचार न-करता त्याच्या घरामधील लहान पोर ही माझ्या डोळ्यासमोर फिरायची. भुकेने व्याकूळ झालेला एखादा गरीब पोरगा जर माझ्यासमोर आला तर त्याला पोटभर मी अन्न देऊ शकलो नाही तर मी मनुष्य म्हणून जन्मालाच कशाला आलो. तर माझ्यातली माणूसकी इतकी खालच्या दर्जाची आणि हिन असेल. त्यांच्या आर्त किंकाळ्या मला दिसत नसतील. त्यांच्या डोळ्यातील भाव मला समजत नसतील. तर मी नेता कशाला झालो. हे द्वंद्व माझ्या मनात सुरु आहे. कि, लढाया लढायच्या का नाही. कि केवळ मी राजकीय भूमिका घेतो म्हणून मला बदनाम करत राहायचं. माझ्यातली आक्रमकता, माझ्यातला लोकांसाठी असलेला आपलेपणा संपवून टाकायचा आणि अखेरीस हल्ल्याने रक्तबंबाळ झालेल्या अभिमन्यू सारखा मी धारातिर्थी पडायचं. हा प्रश्न आज माझ्या मनात येतोय. साथीला कोणीच नाहीये. कारण मी होम क्वारंटाईन आहे.
सामाजिक बहिष्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात कसा असेल हे मी आज अनुभवतोय. आपली माणसे देखील फोन करताना दिसत नाहीत. जणू काही मी मोठा गुन्हा केला आहे. घराच्या बाहेर आलो नसतो तर मला काहीही फरक पडला नसता. खिचडी वाटली नसती तर मला काहीही फरक पडला नसता. लोकांमध्ये गेलो नसतो, कम्युनिटी क्लिनीक उघडले नसते तर मला काहीही फरक पडला नसता. पण, जो आदर्श ठेवून मी लढलोय. ज्या सन्मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांना मी माझा देव मानतो त्या देवाने जे-जे केलं त्यापैकी छोट का होईना ते आपल्या हातातून घडावं. ही सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झाली आहे ती दवडू नये असे मी कायम सगळ्यांना सांगायचो.
18 व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये आलेली प्लेगची साथ आणि त्याच्यामध्ये काही जणांनी केलेले सामाजिक कार्य हे इतिहासामध्ये नमूद आहे. आपल्याला एक सुवर्ण संधी आली आहे आपण हे काम केलं पाहीजे असे मला स्वत:ला वाटत होते. आणि मी स्वत: Risk उचलली. काही जणांनी मला साथ दिली. मनापासून साथ दिली. त्यामध्ये आनंद परांजपे आहे, मिलिंद पाटील आहे. आणि असे असंख्य कार्यकर्ते ज्यांची मुल-बाळ होती, ज्यांचे घर संसार होते ते प्रभाव वाढतोय असे दिसत असताना देखील रस्त्यावर उतरून खिचडीचे वाटप करणे, कांदे- बटाटांचे वाटप करणे, औषधांचे वाटप करणे, लोकांसाठी अॅम्बुलन्सची घेऊन जाणे ही सगळी काम केली जात होती. ह्यामध्ये राजकीय स्वार्थ शुन्य होता. कोणाच नाव नाय, गाव नाय, कोणाचा आता नाय, पत्ता नाय. पण, आतामात्र ही सगळी मी चुक केली अस मला वाटायला लागलयं. कोणासाठी कराययं, कुठल्या समाजासाठी करायचं. म्हणजे ज्या काळामध्ये अंगावर घेऊन काम करण्याची सवय असलेले समाज सुधारक नेतृत्व या महाराष्ट्राने बघितले. तो काळ वेगळा होता अस म्हणायला हरकत नाही. आताचा काळ हा फेसबुक, इंटरनेट आणि ट्रोलींग करणे याच्याशिवाय दुसरे काही नाहीये. मला कोणा विषयी काहीच बोलायच नाहीये. इतकी हीन सामाजिक अवस्था मी माझ्या चाळीस वर्षांच्या राजकीय जिवनामध्ये बघीतलेली नाही. ही कोणामुळे आली, का आली याबद्दल मला आज काही बोलायच नाही.
पण, मी ज्या विचारसरणीशी प्रामाणिक आहे त्या विचारसरणीशी मी प्रामाणिकच राहीन. मी महात्मा गांधीजींना मानणारा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आहे. मी फुले शाहुंना मानणारा आहे. माझ्यामध्ये यतकिंचितही बदल होणार नाही. पण मात्र मी एक ओळखले की, समाजामध्ये गरीबीसाठी लढणारे हे नेहमी लोकांच्या आकसामुळे बळी जातात किंबहुना ते हरतात. त्यांच्यातली शक्ती निपात करण्यासाठी एक व्यवस्थीत डाव आखला जातो आणि अखेरीस ते त्याला बळी पडतात. हे मी माझ्या स्वत:च्या उदाहरणावरुन सांगतो.
आज मलाच वाईट वाटतयं. कि, माझे कार्यकर्ते माझ्यासाठीच बाहेर आले आणि या रोगाला आज ते बळी पडून हॉस्पीटलमध्ये आहेत. त्यांची बायका पोर मला शिव्या घालत असतील. माझे पोलीस बॉडीगार्ड जे माझ्या बंगल्यावर राहत होते, ज्यांची आजपर्यंत माझ्याबरोबर असल्यानंतर त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था ही माझ्या बंगल्यात स्वत:च्या घरात करतो. ते कधीच घरचा डबा आणत नाहीत त्यांच जेवण माझ्या घरीच बनवल जात. या सांगण्यासारख्या गोष्टी नाहीत. पण, जगाला माहीत नसलेला जितेंद्र आव्हाड दाखवण्याची मला सवय ही नव्हती. पण, एक व्हिलन जितेंद्र आव्हाड दाखवण्याच काम गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जणांनी यशस्वीरित्या करुन दाखवल. अर्थात, आज तरी हरलेला दिसतोय. म्हणून तुमची माफी मागतो मला माफ करा.
अभिजीत पवार हा रात्री 11 वाजता भाजीपाला आणण्यासाठी ट्रक घेऊन जायचा. आणि दुस-या दिवशी सकाळी 6 वाजता आणून खाली करायचा. हेमंत वाणी प्रत्येक ठिकाणी आलेल्या मालाची तपासणी करायचा. खरतर मी विसरुनच गेलो होतो कि यांना पण घरदार आहे, यांना पण, मुल बाळ आहेत, त्यांना पण प्रपंच आहे. मध्यंतरीच्या काळात मी सोलापूरला देखील जाऊन आलो होतो. त्यानंतर पालघर मधील लोकांशी देखील वार्तालाप साधला होता.
आजतर टाईम्स नाऊ या इंग्रजी चॅनेलने मी आणि माझी मुलगी पॉझिटीव्ह असल्याची बातमीच दाखवली. म्हणजे राजकारण्यांच्या मुला-मुलींना मायबाप नसतात, राजकारण्यांना मायबाप नसतात हे ह्याच्यावरून सिद्ध झाले. परिस्थिती अवघड आहे.
मी उगाच खिचडी वाटली, उगाच औषधे वाटली, उगाच क्लिनीक काढले. आपण मरायलाच जन्माला आलो आहोत हा इतरांसारखा विचार मी देखील करायला हवा होता. मी मूर्ख निघालो ह्या मूर्ख जितेंद्र आव्हाडला माफ करा…
डॉ. जितेंद्र आव्हाड
मी इथे कवि भा. रा. तांबे यांच्या दोन ओळी नमूद करु इच्छितो…
जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय!’
मी जातां राहील कार्य काय ?
बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन ५५० जागांसाठी भरती जाहीर@mybmc #jobsearch #Careernama #करिअर #Career https://t.co/Rq52K8qrCh
— Careernama (@careernama_com) April 16, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३ हजार पार..
सोन्याच्या किंमतीने मोडले सर्व रेकोर्ड, जाणुन घ्या आजचे भाव
SBI ने ४० करोड ग्राहकांना केले अलर्ट, ‘या’ फेक वेबसाईट पासून रहा सावधान
धक्कादायक! सोलापूरात कोरोनाचे १० नवे रुग्ण
खरंच..! कोरोना चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला होता?
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in