Wednesday, October 5, 2022

Buy now

शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने सांगितली कारणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. दिल्ली दरबारी रोज वरिष्ठ राजकीय मंडळींच्या बैठका या होत आहेत. राष्ट्रपतीपदासाठी अनेक नेत्याची नावेही चर्चेत आहेत. तर महाराष्ट्रातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीतील अनेक अशा पक्षांनी पवार यांच्या नावाला पाठिंबाही दर्शवला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने शरद पवार यांना राष्ट्रपती करू नये, असे म्हणत त्यामध्ये कारण सांगितले आहे.

राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले जाणारे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या राष्ट्र्पती पदाबाबत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, शरद पवार यांच्यासारखे व्यक्तिमत्व स्वत:ला राष्ट्रपती भवनाच्या कोंडवाड्यात कोंडून घेऊ शकत नाहीत. जे राजकारणी मुख्यप्रवाहात असतात, त्यांनी मुख्यप्रवाहातच राहावे. आणि राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत संख्याबळ पाहून निर्णय घेण्यात यायला हवा.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे ग्रामीण भागाशी एक वेगळे नाते आहे. ते आजही ग्रामीण भागात फिरतात, लोकांशी संवाद साधतात ते पाहता त्यांनी याचपद्धतीचे काम कायम करावे. पवार साहेब जर राष्ट्रपती झाले तर त्यामुळे महाराष्ट्राचा सन्मान होईल. पण जोपर्यंत ते लोकांच्यात मिसळत नाहीत तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि आनंद दिसत नाही. त्यामुळे त्यांनी लोकांमध्येच राहावे, तोच त्यांचा खरा हक्क असल्याचे देखील आव्हाड यांनी यावेळी म्हंटले.