कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमळाच्या चिन्हावर सर्वच्या सर्व 29 जागा स्वबळावर लढविणार असल्याचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख यांचे बूथ संपर्क अभियान घेतले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांना माहीती दिली.यावेळी मुकुंद चरेगांवकर, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे,रूपेश मुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी एकनाथ बागडी म्हणाले, आमच्या पक्षात अनेक इच्छुक येण्यास तयार आहेत. पक्षवाढीच्या दृष्टीने वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली कराड नगरपालिकेची निवडणूक लढविली जाणार आहे. कराड शहरात भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी सर्वच वार्डात उमेदवार तयार आहेत. तरीही काही इतर पक्षात असणारे किंवा बंडखोरी करणार्यांनाही कमळाच्या चिन्हावर संधी देण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. परंतु येणारी कराड नगरपालिकेची निवडणूक ही स्वबळावर सर्वच्या सर्व 29 जागा ताकदीने लढविल्या जातील. निवडणूक डोळ्यासमोर असून अनेकजण येण्यास इच्छुक आहेत. आमच्या पक्षात येणार्याचे स्वागतच असणार आहे.
कराड शहरात आगामी होणार्या नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी भारतीय जनता पक्षाकडून करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडी कि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची काय भूमिका असणाऱ हे गुलदस्त्यांतच आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”