हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर काल ईडीने कारवाई केल्यानंतर आज राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर “विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली किरीट सोमय्या यांनी 57 कोटी रुपये गोळा केले आहेत. सोमय्या म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे,” असा गंभीर आरोप केला. त्यानंतर सोमय्यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ” संजय राऊत यांना माझ्यावर संशय आहे कि मी आयएनएस विक्रांत प्रकरणी काही घोटाळा केला आहे. मी त्यांना थेट आव्हान करतो कि त्यांनी माझ्या विरोधातील पुरावे मुख्यमंत्र्यांकडे द्यावे. उगीच या प्रकरणात टाइमपास करून वेळ वाया घालवू नये,” असे सोमय्या यांनी म्हंटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “काल शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुंबई व अलिबाग येथील दोन मालमत्तेवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे राऊत गोंधळलेले आहेत. किरीट सोमय्याने काही केले असेल, तर त्याचे पुरावे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावे. त्यांनी अनेक आरोप केले. मात्र, त्यांना पुरावे मिळालेच नाहीत. ते फक्त टाइमपास करू पाहत आहेत.
शिवसेना नेते संजय राऊतांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या एका कंपनीविरोधात भारत सरकारने कालच मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. राऊतांनी ही कंपनी जानेवारी 2021 मध्ये बनवली. दोन महिन्यांत परवानगी मागितली, कोविड कामे मिळवली, असा आरोपही यावेळी सोमय्या यांनी केला.
संजय राऊतांचे आरोप काय?
आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी ते म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी किरीट सोमय्यांनी पैसे जमावले. कोट्यवधी रुपये जमा केले. त्यासाठी लाखो लोकांनी पैसी दिले. स्वतः किरीट सोमय्यांनी 57 कोटी रुपये जमा केले. मात्र, हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत. केंद्रीय तपास यंत्रणा पारदर्शक असतील, तर त्यांनी या घोटाळ्याची चौकशी करावी. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही राऊतांनी यावेळी केली.