“आता उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोपही उडणार” ; किरीट सोमय्यांचा थेट ईशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. ईडीने एका व्यवहाराची माहिती दिली असून 30 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. आता सर्व गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोपही उडणार आहे,” असा इशारा किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी गेल्या तीन वर्षांपासून श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यावर पाठपुरावा करत आहे. कोट्यवधींच्या मालमत्तेत 30 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. कोट्यवधी रुपये आणि सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर उद्धव ठाकरेंची रात्रीची झोप उडणार आहे. कालच्या प्रकरणात एक पाऊल पुढे जायचे, तर नंदकिशोर चतुर्वेदी आणि उद्धव ठाकरेंचे संबंध काय? उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईकचे संबंध काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या परिवाराला माझी विनंती आहे की जे आर्थिक व्यवहार आहेत, शेल कंपन्यांकडून पैसे घेतले, मनी लाँड्रिंग केलं त्यासंबंधी तुम्ही माहिती देणार की मलाच द्यावी लागणार. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी 2014 मध्ये कोमास प्रॉपर्टीज कंपनी जी बनवली होती. यामध्ये आदित्य ठाकरे मालक पण, संचालक पण, 50 टक्के त्यांचे आणि 50 टक्के रश्मी ठाकरेंचे…या कंपनीची आता नंदकिशोर चतुर्वैदीच्या मालकीची आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर कारवाई –

ईडीच्यावतीने मंगळवारी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई केली. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका जप्त केल्या. या मालमत्तांची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये असल्याचे ईडीने सांगितले. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित स्थावर मालमत्ता जप्त केलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील सदनिकांचा समावेश आहे.

Leave a Comment