हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे खूपच कठीण परिस्थितीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जात आहे. जबाबदारी काम केल्यास यातून निश्चितच बाहेर पडू. रेमडेसिवीरचा साठा पकडल्यानंतर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागत आहे, हे किती मोठे दुर्दैव आहे, अशी बोचरी टीका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली.
मुंबई येथे सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्र बिकट परिस्थितीत चालला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात तसेच सुलभ होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी चालक कमी पडत असल्याने परिवहन मंत्री त्यासाठी काम करत आहे. महापालिका आयुक्तांनी ऑक्सिजन उत्पादकांनाही आदेश दिले आहेत, असे किशोरी पडणेकर यांनी म्हटले आहे.
राज्यातील परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. पण तसे दिसत नाही. विरोधक खूपच आक्रमक झालेले आहेत. योद्धा म्हणून काम करायला तयार नाहीत. परिस्थिती अधिकाधिक कशी बिकट होईल, यासाठी लक्ष दिले जात आहे, अशी बोचरी टीका मुंबईच्या महापौरकिशोरी पेडणेकर यांनी केली आहे