सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
खासदार संजयकाका पाटील यांची आज महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. सदर निवडीबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला.
लोकसभा निवडणूकीपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या पाणी योजनांना पुर्णत्वास आणण्यासाठीचा पाठपुरावा पाहुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या असणाऱ्या टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमोडी, जिये-कटापूर यासारख्या सिंचन योजनांच्या पुर्णत्वासाठी प्रयत्न त्यांनी केले. त्याकरिता भरघोस निधीची तरतूद करुन देवून सिंचन योजनांच्या कामांना गती दिली. तसेच या योजना पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या क्षमतेने योजना कार्यान्वित करून जास्तीतजास्त सिंचन क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न केला. लोकसभा निवडणूकीपूर्वी खासदार संजय पाटील यांनी लाभाचे पद म्हणून सदर पदाचा राजीनामा दिला होता.
खासदार संजयकाका पाटील यांची कामगिरी, सिंचन योजनांबद्दलचा अभ्यास आणि त्याबद्दलचा पाठपुरावा पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर पुन्हा कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे. माझ्याकडून नेहमीच शेतकऱ्यांच्या हीतासाठीच कार्य घडलेले असून या पदावर फेरनिवड झाल्याने सिंचन योजनांना गती देवून दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया संजयकाका पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.