पुणे- नगर- औरंगाबाद Expressway साठी लवकरच भूसंपादन; कोणकोणत्या गावांचा समावेश होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे- अहमदनगर- औरंगाबाद या नियोजित २६८ किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरु होणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्तीसुद्धा केली आहे. हा महामार्ग भोर, पुरंदर, हवेली, दौंड, शिरूर तालुक्यातून जाणार आहे.

भारतमाला टप्पा दोन प्रकल्पांतर्गत ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्ग पुणे जिल्ह्यातून जाणार आहे. भोर तालुक्यातील मौजे कांजळे, वरवे बुद्रुक, कासुर्डी ख.बा., कासुर्डी गु.मा. … पुरंदर तालुक्यातील शिवरे, थापेवाडी, वरवडी, गराडे, कोडीत ख., चांबळी, पवारवाडी, सासवड, हिवरे, दिवे, काळेवाडी व सोनोरी; हवेली तालुक्यातील आळंदी-म्हातोबाची, तरडे, वलटी, शिंदवणे, सोरतापवाडी, कोरेगाव-मूल, भवरपूर, हिंगणगाव; दौंड तालुक्यातील मिरवाडी, दहिटणे; शिरूर तालुक्यातील उराळगाव, सत्कारवाडी, दहीवाडी, आंबळे, करडे, बाभुळसर खु., रांजणगाव गणपती, करेगाव, चव्हाणवाडी आणि गोळेगाव या गावांतून जाणार आहे. या पाच तालुक्यांमधील ४४ गावांमधून हा मार्ग जाणार आहे.

दरम्यान, भोर तालुक्यातील भूसंपादनासाठी भोर-वेल्हाचे उपविभागीय अधिकारी, पुरंदर व दौंडसाठी दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी, हवेलीसाठी हवेलीचे उपविभागीय अधिकारी, तर शिरूर तालुक्यासाठी पुणे शहर-शिरूरचे उपविभागीय अधिकारी यांना भूसंपादनासाठी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे- नगर- औरंगाबाद द्रुतगती महामार्ग भारतमाला प्रकल्पांतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) प्रस्तावित केला आहे.नियोजित 268 किमी लांबीच्या पुणे-औरंगाबाद सहा किंवा आठ पदरी द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाद्वारे बाधितांना सहा हजार कोटींची भरपाई दिली जाणार आहे. तसेच, NHAI द्वारे भूसंपादन, स्थानिक गावांसाठी सेवा रस्ते आणि जिल्ह्यातील प्रमुख रस्ते महामार्गांना जोडले जातील.