महाजॉब्स योजना महाविकास आघाडीची, की शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेस नेत्याचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । महाविकास आघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसने पुन्हा अधोरेखित केलं आहे. राज्य सरकारनं अलिकडेच सुरू केलेल्या महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेस नाराज झाली आहे. या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही. यावरुन “ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची?,” असा सवाल युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी इतर दोन्ही मित्र पक्षांना केला आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त करत महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीचा फोटो ट्विट केला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

सत्यजीत तांबे यांनी ट्विट करून याबाबत आपली नाराजी बोलून दाखवताना म्हटलं कि, ”महाजॉब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की, शिवसेना-राष्ट्रवादीची? आघाडीचं गठन होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अमलबजावणी का होत नाही? हा माझ्यासारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे.”

याआधी सत्यजित तांबे यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय समित्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना उचित स्थान दिले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय समित्यांमध्ये युवक काँग्रेसला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. तांबे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व इतर मंत्र्यांनाही हे पाठविले आहे

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment