योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र ATS कडून मुंबईत अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्यास महाराष्ट्र एटीएस पथकाने शनिवारी रात्री अटक केली आहे. कामरान अमीन खान असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मुंबईतील चुनाभट्टी भागातून त्याला अटक करण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला होता. हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मेसेज आलेल्या नम्बरचा शोध घेतला असता तो मेसेज मुंबईतून आल्याचे समोर आले. यानंतर महाराष्ट्र एटीएस पथकाने कारवाई करत आरोपीस अटक केली. महाराष्ट्र एटीएस कडून याबाबत शनिवारी कारवाई करण्यात आली.

योगी सरकारने डायल ११२ या सेवे अंतर्गत पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांशी संबंधित आकस्मिक सेवांना समाविष्ट केले गेले आहे. ही एक आपत्कालीन सेवा आहे. हा नंबर डायल केल्यावर पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य यांसारख्या सेवा अगदी काही वेळातच पुरविल्या जातात. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात योगी सरकार या क्रमांकावरून एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवत आहे, ज्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याच्या धमकीचा मेसेज पाठवण्यात आला.