मुंबई प्रतिनिधी । राज्यात घडत असलेल्या घडामोडींचा धावता आढावा घेत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. भाजपला सत्तास्थापनेसाठी दिलेल्या वेळेतच शिवसेनेला बसवण्यात आलं. भाजपने असमर्थता दर्शवण्यासाठी वेळ घेतला असल्याची टीका करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आम्ही सोमवारी पहिल्यांदाच अधिकृत चर्चा केली आहे. काँग्रेसने हे स्वतःहून सांगितल्यामुळे भाजपच्या आरोपांना आता उत्तर मिळालं असल्याचं ठाकरे पुढे म्हणाले.
भिन्न विचारसरणीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला येत असलेली अडचण मी समजू शकतो. त्यांना चर्चेला वेळ लागणार आणि हे मलाही मान्यच आहे. आता राष्ट्रपती राजवटीमुळे आम्हालाही विचार करायला वेळ मिळाला असून शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा कायम राहणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. हिंदुत्व ही आमची विचारधारा असून त्यासोबत येणारा विश्वासही गरजेचा असून आता भाजपसोबत जायचा कुठलाही विचार नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जसे आमच्यापुढे काही अटी देतील तशाच अटी आमच्यासुद्धा असतील असं सांगतानाच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करून चर्चेसाठी सहा महिन्यांचा कालावधी दिल्याबद्दल त्यांचेही आभार मानले. इतर राज्यात झालेल्या युत्या, आघाड्या आणि त्यांचे पाठिंबे कसे मिळालेत याविषयी माहिती काढून सत्तास्थापन करण्यासाठी कुणाला वेळ मिळत नाही ते बगतोच असंही ठाकरे पुढे म्हणाले