नाशिक । मुंबईमधील लिलावती रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
“लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे,” अशी माहिती टोपे यांनी माध्यमांना यावेळी दिली.
दरम्यान, ”ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे”. असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांसोबत गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
काय आहे प्लाझ्मा थेरपी
कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते करोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. Covid-19 चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचे अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे. सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीने उपचार करण्यात आले. चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण १२ दिवसांच्या आत त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. नव्या उपचार पद्धतीमध्ये करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर करोना मुक्त रुग्णाचे रक्त वापरण्यात येते. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे असे या उपचार पद्धतीचे नेतृत्व करणाऱ्या एका डॉक्टराने सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”