पुणे प्रतिनिधी | कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भाजप प्रवेशाचे वेध लागले असून त्यासाठी त्यांनी काल त्यांच्या कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना भाजप प्रवेश करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर त्यांनी आज आपला निर्णय पूर्ण विचारांती येत्या १० सप्टेंबर पर्यंत जाहीर करतो असे म्हणले आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस उभा राहण्यास तयार नसल्याचेच चित्र आहे. कारण हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याच्या आधी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना फोन करून विनंती केली होती की पक्षाचा काय तो निर्णय सांगावा माझ्या कार्यकर्त्यांचा उद्या मला मेळावा घ्यायचा आहे. त्यावर थोरात यांनी राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरु आहे. त्यांचा निर्णय बाकी आहे अशी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने हर्षवर्धन पाटील नाराज झाले आहेत. १० तारखेला पक्षांतराची घोषणा करण्याचे त्यांनी म्हणले असल्याने काँग्रेसला हा एकप्रकारे अल्टिमेटम दिला गेला आहे. येत्या पाच दिवसात राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला इंदापूरच्या जागेवर निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघात २०१४ साली काँग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी पराभव केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी मध्यस्थी करून हर्षवर्धन पाटील यांना सुप्रिया सुळे यांचे प्रचार कार्य करायला सांगितले. त्यानंतर आपण तुम्हाला इंदापूरची जागा सोडू असे देखील राष्ट्रवादी तेव्हा म्हणाली मात्र गरज पूर्ण होतात राष्ट्रवादीने हर्षवर्धन पाटील यांना चले जावंचा रस्ता दाखवला. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या अशा नीतीला कंटाळून हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकण्याची तयारी केली आहे.