हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळीनिमित्त गोविंदबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडली. सध्या या भेटीबाबत राज्यात वेगवेगळ्या चर्चा निर्माण झाल्या असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी, “महाराष्ट्रामध्ये भविष्यात फक्त दोनच नेते राहतील” असे थेट विधान केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्रामध्ये भविष्यात दोनच नेते राहतील, जसे त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोनच नेत्यांचे राजकारण होतं. आता शरद पवार आज पुन्हा एकदा संकटातून उभे राहत आहेत. नेतृत्व करत आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल घेऊन उद्धव ठाकरे पुढे निघाले आहेत. पुढे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे दोनच नेते महाराष्ट्रात यशस्वी झालेले दिसतील”
त्याचबरोबर, “मी शरद पवार यांना ओळखतो. अजित पवार आणि शरद पवार कितीही एकत्र दिसले तरी 2024 च्या निवडणुकीत शरद पवार त्यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटाला माती चारल्याशिवाय राहणार नाही. काही कौटुंबिक गोष्टी असतात, संस्थात्मक गोष्टी असतात. दोघांचं देखील मैदान बारामती आहे. पण बारामती शरद पवारच मारतील. महाराष्ट्रात देखील शरद पवारच असतील” असे वक्तव्यं संजय राऊत यांनी केले आहे.
दरम्यान, “दिवाळीनंतर उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील. शिवसेनेच्या सर्व नेत्यांवर महाराष्ट्रातल्या विविध विभागांच्या संघटनात्मक बाजूची जबाबदारी देण्यासंदर्भात लवकरच घोषणा होईल. सध्या जे नवीन नेते निर्माण झालेले आहेत, त्यातील प्रमुख नेत्यांसह इतर प्रमुख नेत्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी द्यायची घोषणा लवकरच एक ते दोन दिवसात आपल्यासमोर येईल” अशी माहिती यावेळी राऊत यांनी दिली आहे.