दिवाळी म्हटलं कि फराळ आलं. चकल्या, चिवडा, शंकरपाळी असं बरच काही. मात्र जर या फराळात काही पौष्टिक पदार्थांची भर घातली तर. आज आपण असाच एक पौष्टिक पदार्थ बघणार आहोत तो म्हणचे मुगाच्या पिठाचे पौष्टिक लाडू. लाडू हा पदार्थ तसा लहान मुलांना चटकन आवडणारा आणि घरातील वृद्ध व्यक्तींना सहज खाता येणारा. त्याला जर पौष्टिकतेचे जोड दिली तर आरोग्याच्या दृष्टिने हा एक उत्तम दिवाळी फराळ होईल. चला तर जाणून घेऊया मुगाच्या पिठाचा पौष्टिक लाडू कसा तयार करतात ते..
साहित्य : २ कप मुगाची डाळ स्वच्छ धुऊन, १०-१५ मिनिटे भिजवून, फडक्यावर वाळवून घ्या व मग भाजा, रवाळ दळून घ्या.
कृती : साजूक तुपावर रवाळ पीठ भाजून घ्या. पीठ फार बारीक दळल्यास लाडू खाताना टाळ्याला चिकटतो, म्हणून ‘भुरी शक्कर’ घालून वळा. भुरी साखर अशी बनवा- दीड कप साखर व १ कप पाण्याचा पाक करत ठेवा. २ थेंब लिंबाचा रस व १ चमचा तूप घाला. पाक पक्का झाल्यावर गॅस बंद करा. ही साखर मिक्सरमध्ये दळून वापरा. या साखरेमुळे लाडू खमंग लागतो. मऊ केलेला गूळ घालूनही लाडू बनविता येतील. डाळीचं पीठ वरील पद्धतीने केल्यास लाडू पचायला हलका होतो. (लिंबाचा रस घातल्याने साखर स्वच्छ होईल.)
पाक परातीत घालून जड भांडय़ाने घोटल्यासारखे केले तरी पांढरीशुभ्र साखर मिळेल.