Wednesday, October 5, 2022

Buy now

साबरमती : गांधीनीतीची प्रयोगशाळा…

महात्मा गांधी जयंतीविशेष | विनायक होगाडे

साबरमती…
राजस्थानातून उगम पावून गुजरातमधून अरबी समुद्राच्या कुशीत विलीन होणारी नदी…! गुजरात राज्याची महत्वाची दोन शहरं म्हणजे अहमदाबाद आणि गांधीनगर… याच साबरमती नदी किनारी वसलेलं अनुक्रमे एक व्यापारी शहर तर दुसरं राजकिय…! दोन्ही शहरं म्हणजे गुजरात राज्याची फुप्फुसं…!
अहमदाबादमध्ये उतरलो त्याक्षणापासून या शहराचं महत्व पदोपदी जाणवत होतं. कापड उद्योगात अग्रेसर अहमदाबाद हे भारताच मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं…
या नदीचं आणि या शहराचं महत्व तेंव्हा द्विगुणित झालं जेंव्हा मोहनदास गांधी नावाच्या माणसाने या नदीकाठी अहमदाबाद या व्यापारी शहरामध्ये आपला आश्रम उभा केला.

आफ्रिकेतील फिनिक्स आणि टॉलस्टॉय आश्रमाचा अनुभव पाठीशी होताच… आणि भारतात आल्यावर नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंच्या सांगण्यावरून 1915 मध्ये गांधींनी भारत पिंजून काढून भारतीय समाजमन समजून घेतलं होतं. भारतातील गांधींचा पहिला आश्रम हा ‘सत्याग्रह’ आश्रम… आधी कोचरबला असलेला तो आश्रम गांधींनी साबरमती किनारी हलवला… तारीख 17 जून 1917… या आश्रमाने मागच्याच वर्षी शंभर वर्षे पूर्ण केली… तरीही… हा आश्रम अजूनही आपल्याला त्या काळात घेऊन जातो…त्याची डागडुजी आधुनिक पद्धतीने केलेली असली तरीही त्याची बांधणी,त्याचा वास,त्याची जाणीव मनाला त्या काळात घेऊन जाते. आश्रम स्थापतानाच त्याच्या नियमावलीत गांधींनी म्हटलं होतं की ‘आयुष्यभर देशाची सेवा करण्याचे शिक्षण प्राप्त करून देशाची सेवा करणं’ हा मुख्य उद्देश…!

गांधी म्हणायचे की, ‘ आश्रम हा सामुदायिक धार्मिक जीवन आहे…धार्मिक म्हणजे रूढार्थाने ग्रंथात सांगितलेला धर्म नव्हे तर आपल्या आतून जो विकसित होईल तो धर्म… आपल्याला धर्माच्या या मूळ रुपाला जागृत करावं लागेल..! त्यासाठी हा आश्रम…!’

भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने या आश्रमाचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. जवळपास 12 वर्षे गांधी या वास्तूत राहिले…
या वास्तुतून देशाच्या अनेक आंदोलनांची,चळवळींची दिशा ठरली… गांधींच्या भारतातील राजकीय चळवळीची मुहूर्तमेढ इथेच रोवली गेली… त्याच्या भारतातील महात्मापणाची सुरवातच या आश्रमातून झाली असं म्हणता येईल…!
चंपारण्य आणि खेडा सत्याग्रहाची यशस्विता… अहमदाबाद गिरणी कामगारांचा संप… यंग इंडिया आणि नवजीवन साप्ताहिकाचे संपादन… असहकार आंदोलन… दांडी यात्रा…असे अनेक महत्वपूर्ण घटना या आश्रमाने गांधी समवेत अनुभवल्या…!

योगायोगाची बाब अशी घडली की मी ज्या दिवशी आश्रमात उतरलो तो दिवस होता 12 मार्च… अर्थात ज्या दिवशी गांधींनी मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहासाठी 400 किमी पायी प्रवास करण्याची सुरूवात करत दांडी येथे मिठाचा कायदा मोडला… आश्रमातून आपल्या मोजक्या 79 सत्याग्रहींसोबत निघण्याचा हा दिवस…!
गांधीनी या दांडी यात्रेनंतर असं जाहीर केलं की, पूर्ण स्वराज्य जोवर मिळत नाही तोवर मी पुन्हा साबरमती आश्रमात परत येणार नाही…! या आश्रमाने गांधींसोबत पाहिलेला,अनुभवलेला आश्रमाच्या दृष्टीने कदाचित हा शेवटचाच लढा…!

गांधी हा माणूस एकतर स्वतःला धार्मिक म्हणवून घेणारा… वरून त्याच्या धार्मिकतेची व्याख्याच इतरांच्या दृष्टीने विचित्र…
राहणं, वागणं,खाणं-पिणं, सारी जीवनशैली आश्रमी… याची आध्यात्मिकता जगावेगळी… वरून हा माणूस राजकारणात… म्हणजे सारंच तर्हेवाईक…
याला संत म्हणावं की राजकारणी… हे त्याच्या अनुयायांना पडलेलं कोडं…
आणि महाराष्ट्र हा केंद्रबिंदू ठरुन ते ही सारं काही चित्पावन ब्राम्हनांच्या भोवतीनेच फिरणारे भारतीय स्वातंत्र्याचं राजकारण… नेमस्तही चित्पावन आणि जहाल – अति जहालही चित्पावनच…!
याच्या आंदोलनात गोखल्यांच्या राजकारणाची नैतिक चौकट तर आहे तशीच पण टिळकांच्या मार्गाचा जहालपणादेखील ठासून भरलेला… एकतर महाराष्ट्रातून गुजरातकडे आणि चित्पावनांनकडून एका बनिया म्हाताऱ्याकडे केंद्रीभूत झालेलं राजकारण आणि याला नेमस्त समजावा की जहाल…? याला नेता मानावा की विरोधक… आणि याला विरोध करावा तर तो कसा…? हे त्याच्या विरोधकांना पडलेलं कोडं…!
हे गांधी नावाचं गूढ भारतीय राजकारणात जिथून ढवळाढवळ करत भारतीय राजकारणाची दिशा आणि दशाच बदलावून टाकत होत… त्या साबरमती आश्रमाचं गूढही असंच न समजणार वाटावं असं आहे…
गांधी ज्या खोलीत रहायचे त्या खोलीत त्यांचा चरखा, बैठक, टेबल सारं काही तसच आहे… ‘ह्रदयकुंज’ ही फक्त गांधींची खोली नव्हती… ती त्यांची मिटिंग रूम देखील होती… इथंच अनेक आंदोलनांची बैठक झाली… जगभरातील अनेक लोक गांधींना भेटले ते इथेच…!

गांधींच्या खोलीच्या मागील बाजूस कस्तुरबांची खोली…! आणि समोर उजव्या बाजूस विनोबा भावे आणि मेडेलीन स्लेड अर्थात मीराबेनची खोली…!
मला आश्रमात गेल्यावर सगळ्यात जास्त आकर्षण होतं ते म्हणजे चरख्याचं आणि प्रार्थनास्थळाच…!

चरखा ही काही गांधींची हौस नव्हती…
ज्यामुळे भारतातील करोडो लोकांचं सहज संरक्षण होईल असा कोणता स्वदेशी धर्म असू शकतो… तर तो अर्थातच चरखा आणि खादी…
खादी सामाजिक स्वदेशीचं पहिलं पाऊल होतं…
आता आश्रमात जावं आणि चरख्यावार बसून एक फोटो काढून यावं इतपतच त्याचं मूल्य हलकं नाहीच…!
चरखा भारतीय स्वातंत्र्यांच्या राजकारणाचा प्रतीक बनला तो यासाठी की, इथला कापूस स्वस्तात विकत घेतला जाऊन इंग्लडला जातो आणि विदेशी कपड्याच्या स्वरूपात इथं येतो…. या व्यापारातून अमाप फायदा ब्रिटिशांना मिळतो…

पण खादीच्या चळवळीने ब्रिटिशांच्या आर्थिक उलाढालीचं कंबरडं मोडलं…!
फिरणारा चरखा भारतीयांना फक्त रोजगार देत नव्हता तर ब्रिटिशांची आर्थिक सत्ता तो सपाट करत होता…
आपण जेंव्हा आता चरख्यावर बसतो तेंव्हा फक्त धाग्यांची नाही तर त्या साऱ्या मूल्यांची कताई करत असतो… त्या सुताचा बनणारा धागा आपण आता उपभोगत असलेल्या स्वातंत्र्याच्या नाळेशी जोडला गेलाय… हे पदोपदी जाणवतं…!

कापसापासून धागा बनताना बघताना वेगळाच आंनद मिळतो…गांधी निव्वळ सूत कातत नव्हते… त्याबरोबर ते भारतीय समाजाचं मन कातत होते… त्याला मूल्यांची जोड देत होते…समाजातील हरेक वर्गातल्या हरेक प्रकारच्या धाग्याला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे ते राजकारण होतं… गांधी चरखा फिरवत राहिले…आणि धागे आपोआप जुळत राहिले याला कारण होतं… सत्य,अहिंसा आणि प्रामाणिक प्रयत्नाची जोड यांची…!

तुम्ही जरा जास्तच ताण दिलात किंवा हिसका दिलात तर धागा तुटतो… चरखा चालवताना महत्वाची गोष्ट आहे ती निघणाऱ्या धाग्याच्या अनुषंगाने सातत्यापूर्ण हाताच्या हालचालींची…! त्यासाठी चरखा काहीवेळा मागेही फिरवावा लागतो…! हिंसेच्या हिसक्याने मिळणारे स्वातंत्र्य हे अधार्मिक स्वातंत्र्य ठरेल… ते धाग्यांना धाग्यांपासून तोडणारे ठरेल. आणि असे अधार्मिक स्वातंत्र्य हे पुन्हा अराजक आणि हिंसेलाच निमंत्रण देतं… म्हणून गांधी साध्य-साधन विवेक महत्वाचा मानायचे… आणि म्हणून गांधी चौरीचौराच्या हिंसेनंतर ऐन भरात आलेलं असहकार आंदोलन मागे घेतात…!

चरखा चालवताना धागा तुटलाच तर तो पुन्हा जोडावा लागतो… हा अलग झालेला धागा जोडण्याची रित मला खूपच निराळी आणि आश्चर्यकारक वाटली…
तुम्ही जर तुटलेला धागा पुन्हा कापसावर ठेवलात आणि चरखा फिरवायला लागलात की आपोआप धागा सुताशी जोडला जातो… सुतातील रेषा आपोआप धाग्याशी जोडून घेतात…
त्या धाग्याभोवती त्या आपोआप जमा होतात…
गांधीं लोकांना प्रामाणिक हाक द्यायचे आणि लोक आपोआप जमत जायचे… सत्याग्रह करायचे… मार खायचे… तुरुंगात जायचे… विनयपूर्वक कायदे तोडायचे खरे पण तुरुंगात कायदे तितक्याच सचोटीने पाळायचे… लहान शाळकरी मुलं, घराबाहेर न पडलेला बाया,अस्पृश्य, कामगार,शेतकरी, आदिवासी सगळेच बाहेर पडले आणि गांधीभोवती जमा झाले…
गांधी खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणातला तो महत्वाचा धागा बनला…!

वैयक्तिक विकास आणि सामाजिक परिवर्तन यासाठी सत्याग्रह अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे त्यांनी आश्रमाला सत्याग्रहाची प्रयोगशाळाच बनवायचे ठरवले आणि म्हणून आश्रमला नाव देखील ‘सत्याग्रहाश्रम’ असेच दिले.
गांधींनी याच सत्याग्रह आश्रमात आपल्या अस्पृश्यता विरोधी आंदोलनाची सुरवात केली असं म्हणता येईल… दादुभाई नावाच्या एका अस्पृश्याच्या परिवाराला आश्रमात रहायला घेऊन त्यांनी आपल्याच काही सहकाऱ्यांचा जणू रोषच ओढवून घेतला होता… अगदी कस्तुरबांचाही…! त्यांची बहीण रलियातबहनने त्यांच्यासोबत न जेवता वेगळे जेवण बनवण्याची परवानगी मागितली पण आश्रमात राहायचे असेल तर अस्पृश्यतेला थारा नाही… अस सुनावल्यावर त्यांच्या बहिणीने हे मान्य नसल्याने तो आश्रम सोडला…
निव्वळ ह्यांचाच रोष नव्हे तर आश्रमाला मिळणाऱ्या देणगीवरही याचा परिणाम झाला… पण मागे हटतील ते गांधी कसले…?

मगनलाल गांधी,काका कालेलकर,जमनालाल बजाज,किशोरीलाल मश्रूवाला,नरहरी पारीख,मेडेलिन स्लेड,महादेव देसाई,विनोबा भावे,प्यारेलाल,पं. नारायण खरे हे महत्वाचे आश्रमवासी म्हणता येतील…

मगनलाल गांधी ज्यांना गांधी ‘आश्रमाची आत्मा’ म्हणायचे… त्यांनीच विविध विकसित चरख्याच्या डिझाइन्स बनवल्या… आजही तिथे त्या बघायला मिळतात…

मेडेलिन स्लेड नावाची एका ब्रिटिश एडमिरलची मुलगी रोमाँ रोला यांच्याकडून गांधींचं महात्म्य ऐकून इतकी प्रभावित झाली की तिनं आपलं उर्वरित आयुष्य गांधीवादी जीवनप्रणालीचा स्वीकार करून याच महात्म्याच्या चरणी विलीन केलं… ती 7 नोव्हेंबर 1925 मध्ये याच आश्रमात आली आणि आयुष्यभर गांधींची मिराबेन झाली…
महादेव देसाई,प्यारेलाल यांनी गांधींचे सचिव म्हणून कामगिरी पार पाडली…
यातला प्रत्येक माणूस गांधींना महात्मा बनवण्यात योगदान देणारा आहे…

आश्रमाच्या नियमावलीच्या स्वरूपात एकादश व्रत महत्वाचे ठरले… सत्याचा आग्रह जर आश्रमाचं मूळ असेल तर त्या सत्याकडे जाण्यासाठी प्रार्थना हा मार्ग आहे… सत्य हाच ईश्वर आहे आणि त्या ईश्वराकडे जाण्याचा मार्ग प्रार्थना आहे…
असं गांधी म्हणायचे…
अजूनही तिथे प्रार्थना होते… लोक फार नसतात खरे… पण त्याच जागेवर सर्व धर्मांची प्रार्थना मात्र होते…!
मागे संथ वाहणारी साबरमती आणि पुढे ईश्वराचे नामस्मरण…

या आश्रमातील शांत आणि स्थिरचित्ताने बसलेला गांधींचा पुतळा आपोआप मन खेचून घेतो… गळ्यात खादीच्या दोर्याची माळ आणि डोळे झाकलेले…
त्याच्या सान्निध्यात बसावसं वाटतं… फक्त त्यालाच पहात बसावसं वाटत…!

गांधींची ती मूर्ती प्रचंड ताकदीची म्हणावी लागेल…
ज्या भूमीत गांधींनी ‘सत्याचे प्रयोग’ लिहले… तीच भूमी ‘असत्याच्या प्रयोगांची’ प्राथमिक प्रयोगशाळा व्हावी… 2002 साली साबरमतीने द्वेषभक्तीच्या राजकारणाचे लाल रक्त वाहून न्यावे… याहून दुर्दैव ते कोणतं…?
ज्या विचारधारेने गोळ्या घालून संपवलं… त्या विचारधारेचे पंतप्रधान विदेशी पाहुण्यांना घेऊन येतात… दंगलींच्या रक्ताने माखलेले हात जोडून स्वतःही नतमस्तक होतात…!
गांधींना मारायचे प्रयत्न आजही होतात… सातत्याने होतात… गांधी कभी मरते नहीं, हे बहुदा आता उमजलं असावं आणि म्हणून कदाचित आता गांधींच्या अपहरणाचा प्रयत्न असेल तो…!

असो… पण मुद्दा असाय की, विविध जाती,धर्म,प्रांत,भाषा यांनी बनलेला व्यामिश्र अशा मानसिक जडणघडणीचा भारतीय जनमानस…आणि या भारतीय जनमानसाच्या इच्छा,आशा आणि आकांक्षांचे प्रतीक बनले होते गांधी… लोक त्यांना बापू अर्थात पिता मानायचे… साऱ्या भारताचा पिता…!

एका बाजूला राजकीय आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक सुधारणेच्या मंथनातून जात असताना एकावेळी अनेकांच्या सामाजिक रोषास बळी पडणं सहाजिक होतं…
हिंदू धर्मात शंकर आणि भारतीय इतिहासात गांधी यांचं स्थान अनन्यसाधारण आहे…
अस म्हणतात की, भगवान शंकरानेच गंगा गुजरातला आणली, आणि तीच साबरमती नदी ठरली…! साबरमतीचा हा संत
भारतीय जनमानसाचा फक्त पिता नव्हता तर तो त्याच शंकरप्रमाणे नीलकंठदेखील ठरला… भारतीय स्वातंत्र्याची,सामाजिक सुधारणेची लढाई पुढे रेटताना त्यांना सनातन्यांचे हे विष नीलकंठ बनून पचवावे लागले…!
गांधी अजूनही ते विष पचवतो आहे… साबरमती आश्रमातील ती गांधींची मूर्ती पहिली की सतत वाटत राहतं गांधीं अजूनही सर्व विष पचविण्यास सक्षम आहे…
गांधींचा आश्रम आजही तसाच आहे…
ह्रदयकुंजही तसाच आहे…
मात्र गरज आहे गांधींना पुन्हा आपल्या आत ह्रदयात डोकावून शोधण्याची…!

Vinayak Hogade

विनायक होगाडे

9511661381

(लेखक अनिस चे युवा कार्यकर्ते, मुक्त पत्रकार तसेच नाट्य अभिनेते आहेत.)