‘मविआ’चा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. मध्यंतरी झालेल्या पक्षांमधल्या फुटीमुळे तर राजकीय समीकरणं क्लिष्ट होऊ लागली आहेत. अशावेळी, मविआ (Mahavikas Aghadi) जागा वाटपाचा मुद्दा कशाप्रकारे सोडवेल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. तर, राजकिय वातावरण तापले असताना आगामी निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणता फॉर्मुला वापरेल? याबाबत देखील तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. यादरम्यानच, आगामी काळात मविआचं जागावाटप होईल अशी महत्वपूर्ण माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात मविआ मजबूत आहे. मविआ विधानसभा, लोकसभा एकत्र लढणार आहे. अनेकांना जागावाटपात तडजोडी कराव्या लागतील. ते करायला आमची तयारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं आहे की जागावाटपावरील मतभेद उघड करायचे नाहीत. जिंकेल त्याची जागा, जागेचा हट्ट धरायचा नाही हे सूत्र आहे” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर देखील भाष्य केले. इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होणं याला महत्त्व आहे. पाटण्यात आधी बैठक झाली. तिथे नितीश कुमार यांची सत्ता आहे. बंगळुरूत काँग्रेसची सत्ता होती. तिथेही आमची बैठक झाली. पण महाराष्ट्रात सत्ता नसताना बैठक घेत आहोत. सत्तेशिवाय आम्ही बैठक घेत आहोत. सत्तेशिवाय बैठक घेणं हे आव्हान आहे. हे आव्हान आम्ही स्वीकारलं असल्याच संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुका रद्द करण्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. माध्यमांशी बोलताना, “सिनेटची निवडणूक रद्द केली यात आश्चर्य वाटावं असं काहीही नाही. राज्यातलं सरकार भीतीपोटी कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही. सिनेटच्या निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेचं पॅनल १०० टक्के जिंकणार होतं. या भीतीपोटी या निवडणुका रद्द केल्या. आपण किती निवडणुका रद्द करणार आहात? तुम्ही महापालिकेच्या निवडणुका त्याच भीतीपोटी घेत नाहीत. उद्या या भीतीपोटी तुम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळी घेणार नाहीत का?” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.