मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची आज मुंबईमध्ये बैठक पार पडली. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर ‘काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळायला पाहिजे’, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असंही थोरात यावेळी म्हणाले.
राज्याचे काही प्रश्न घेऊन एकत्र चर्चा केली. चक्रीवादळ झालं त्या पाहणीसाठी विजय वडेट्टीवर गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांसाठीही आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्याही काही मागण्या आहेत. निर्णय प्रक्रियेत आम्हाला सामील करणं अपेक्षित आहे, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलू,’ असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
दरम्यान, महाविकासआघाडीचं सरकार चालवताना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. कोरोनाच्या संकटात घेण्यात येणारे निर्णय तिन्ही पक्षांची चर्चा करून घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसतंय, त्यामुळे निर्णयांमध्ये सहभागी नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in