मुंबई । महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रकियेत स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटण्यासाठी वेळही मागितली, मात्र, गेल्या सोमवारी होणारी ही भेट अजून झालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नियोजित भेटी आधी शिवसेना नेते अनिल देसाई यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.
काँग्रेसचं गाऱ्हाणं ऐकून घेण्यासाठी अनिल देसाई बाळासाहेब थोरातांना भेटले. लवकरच मुख्यमंत्री काँग्रेस नेत्यांना भेटीसाठी वेळ देणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अनिल देसाई थोरातांच्या भेटीला आले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. हे सरकार चांगल्या रितीने सुरू आहे. तिन्ही पक्ष चांगलं सरकार चालवत आहेत. लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी बाळासाहेब थोरात यांची भेट घेतल्यानंतर दिली,
महाविकासआघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याचा आक्षेप काँग्रेसच्या नेत्यांना आहे. अशोक चव्हाण यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्येही यावर भाष्य केलं. मागच्या आठवड्यात काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यावरून बैठकही पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन काँग्रेसची तक्रार मांडत निर्णय प्रकियेत स्थान देण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे खुद्द प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं होत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”