हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) साठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) जागावाटपेचा फॉर्मुला ठरला आहे. TV9 मराठी या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिंदे गट असा सामना पहायला मिळणार आहे.
काल मुंबईत यशंवतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. महाविकास आघाडीमध्ये यामधील सर्वाधिक जागा शिवसेना लढवणार आहे. एकूण 48 जागांपैकी शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढणार आहे. याशिवाय आपापल्या मित्रपक्षांना स्वतःच्या कोट्यातून जागा द्याव्यात असंही महाविकास आघाडीचं ठरलं आहे.
मुंबई आणि उपनगरमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत. त्यामधील चार जागा शिवसेनेला देण्याबाबत चर्चा झाली. तर बाकी दोन जागांपैकी एक काँग्रेसला, तर एक जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार असल्याचे समजते. सध्या या जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. याबाबत आणखी काही बैठका घेऊन त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे समजते. ज्या भागात ज्या पक्षाची ताकद जास्त आहे ती जागा त्या पक्षाला देण्याचा निकष या जागावाटपात ठरला आहे .