हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेत आहे. काँग्रेसमध्ये तब्बल २० वर्षांनी अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर असतानाच आता राजस्थान काँग्रेस कमिटीने मात्र राहुल गांधी यांनाच काँग्रेस अध्यक्ष करावं असा प्रस्ताव मंजूर केला आहे. राजस्थान कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची शनिवारी बैठक झाली, यात हा निर्णय घेण्यात आला.
अशोक गहलोत यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. ते राजस्थानच्या बाहेर जाण्यास इच्छुक नाहीत. राहुल गांधी हेच काँग्रेस अध्यक्ष व्हावेत अशी खुद्द अशोक गेहलोत यांचीच इच्छा असल्याचे राजस्थानचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांनी सांगितले. पक्षातील सर्व सदस्यांचे मत लक्षात घेऊन आम्ही राहुल गांधींना पाठिंबा दिला आहे असं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे राहुल गांधी याना अध्यक्ष करावं असा ठराव मंजूर करणारे राजस्थान हे पहिले राज्य आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार २२ सप्टेंबरला निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. १७ ऑक्टोबरला मतदान तर १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी, अशोक गेहलोत आणि मुकुल वासनिक यांची नावे चर्चेत आहेत. मात्र अजूनही राहुल गांधी अध्यक्ष पदासाठी इच्छुक नसल्याचे समजत आहे.