हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रात द्या असे सांगितले. त्याचबरोबर, “मराठे एवढे खालच्या पातळीचे नाहीत. त्यामुळे ते नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाहीत. आपणही अर्धवट आरक्षण घेणार नाही” अशी भूमिका मांडली. याबाबतची माहिती स्वतः जरांगे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधत दिली.
सर्व महाराष्ट्राला आरक्षण द्या
माध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले की, “आज मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले की, आम्ही नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नाही. आपण अर्धवट आरक्षण घेणार नाही. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. त्यामुळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत. मराठवड्यात कागदपत्रे जमा करा आणि सर्व महराष्ट्राला आरक्षण द्या. विशेष अधिवेशन घ्या, समितीचा प्रथम अहवाल स्वीकारून तिला राज्याचा दर्जा द्या”
आत्महत्या करू नका
त्याचबरोबर, “कालपासून मी पाणी पितोय, मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा. पाण्यामुळे तब्येत चांगली झालीय, उठून बसलोय. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू आहे.आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा” असे आवाहन जरांगे पाटलांनी आंदोलकांना केले.
दरम्यान, राज्यात कालपासून मराठा आरक्षण आंदोलनाने घेतले आहे. तर अनेक आमदारांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याविषयी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, “मराठा समाजाने संयम राखावा, थोडं टप्प्या टप्प्यात होऊ द्या, बंदचा विचार तूर्तास करू नये. सर्व आमदार खासदार मुंबईतच राहा. राजीनामा दिल्याने काय फायदा होतो कळत नाही पण सर्वांनी मुंबई सोडायची नाही” असे आवाहन त्यांनी राजीनामा देणाऱ्या नेत्यांना आणि मराठा बांधवांना केले.