घरी परतण्याच्या तिकीट नोंदणीसाठी गाझियाबादमध्ये लोकांची झुंबड, गर्दी नियंत्रणाबाहेर..!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तब्बल २ महिन्यानंतर आपल्या घरी परतण्यासाठी रेल्वे बुकिंगसाठी हजारो स्थलांतरित कामगारानी रामलीला मैदान, गाझियाबाद येथे गर्दी केली. यावेळी एकाच मैदानात काही हजार लोकांनी गर्दी केल्याने प्रशासनालाही बरीच धावपळ करायला लागली. एकमेकांच्या अंगावर जात, आरडाओरडा करत नाव नोंदणीचं काम याठिकाणी दिवसभर चालूच राहीलं.

गेल्या काही दिवसांपासून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने अनेक देशांची स्थिती दयनीय करून टाकली आहे. भारतात २५ मार्च रोजी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशव्यापी संचारबंदी लागू करण्यात आली. जागोजागी पसरलेल्या आणि हातावर पोट असणाऱ्या स्थलांतरित कामगारांचे मात्र या संचारबंदीत हाल झाले. काम बंद झाले, शिल्लक असणाऱ्या धान्य आणि तुटपुंज्या पैशावर काही दिवस उदरनिर्वाह झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येकासमोर उभा राहिला. संचारबंदीमुळे गावीही परत जाता येत नव्हते. देशभरात विविध ठिकाणी उभ्या केलेल्या शिबिरांमधील अस्वस्थ कामगारांनी घरी परतायचे ठरवले आणि मिळेल त्या पर्यायाने घरी परतू लागले. अनेकांनी पायपीट केली. आणि आता सरकार या स्थलांतरित कामगारांना घरी परतण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देत आहे. एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर असताना या कामगारांची सुविधाही महत्वाची आहे. 

रामलीला मैदानावर हजारोंच्या संख्येने रेल्वे बुकिंगसाठी जमलेला हा जमाव चिंतादायक चित्र निर्माण करतो आहे. कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर घरी परतल्यावर या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आणखी वाढली आहे. देशभरातील रुग्णांची संख्या ९६ हजार पार करून गेली आहे. आता हे कामगार परतत असलेल्या बिहार, उत्तरप्रदेश सारख्या राज्यांनी मोठ्या प्रमाणात तपासणी करणे गरजेचे आहे. या परतलेल्या कामगारांसाठी अलगाव च्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी तात्काळ वैद्यकीय सुविधांची सोय केली पाहिजे. मागच्या काही दिवसात रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे ते पाहता आपली वैद्यकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर आणि सर्वांसाठी अन्नधान्याची व्यवस्था करण्यावर सरकारने भर देणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे. देशभरातून असे कामगारांचे लोंढे आपापल्या गावी परतत आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पुढे येऊन युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे. तरच येत्या काळात आपण ठामपणे उभे राहू शकू.