संसदेत चीन, महागाईवर बोललो की माईक ऑफ; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आली आहे. यावेळी नांदेड येथील एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी लोकसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांचे काय होते हे दाखवण्यासाठी २ वेळा त्यांचा मायक्रोफोन बंद केला. राहुल गांधी यांनी आपला मायक्रोफोन बंद करत म्हटले, ‘आम्ही ही भारत जोडो यात्रा सुरू केली कारण मीडिया पर्दाफाश करण्याच्या स्थितीत नाही आणि संसदेतही विरोधकांसोबत असेच घडते.

यावेळी राहुल गांधी यांनी मायक्रोफोन बंद करून आपले भाषण सुरू ठेवले आणि त्यानंतर त्यांनी माईक चालू करताच म्हणले, किमान इथे तरी आमचा कंट्रोल आहे. संसदेत आम्ही बोलत असताना २ मिनिटातच माईक ऑफ केला जातो. आम्ही पाहतच राहतो. विरोधकांना नोटाबंदीच्या विरोधात बोलायचे असेल तर माईक बंद केला जातो, चीनवर बोललो तर माईक ऑफ, कोणत्याही मुद्द्यावर काहीही बोला…. कोणाला काहीच ऐकू जाणार नाही कारण माईक ऑफ केला जातो असं राहुल गांधींनी सांगितलं.

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी पासून उत्तरेकडे जात आहे. ७ नोव्हेंबरला ही यात्रा महाराष्ट्रात आली असून तब्बल १४ दिवस महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा असेल. काँग्रेसचे दिग्गज नेतेमंडळी या यात्रेत सहभागी झाले आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे सुद्धा भारत जोडो यात्रेत आपला सहभाग नोंदवतील.