मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंज येथे कोरोनाने धडक दिली. राज ठाकरे यांच्या घरी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसची Coroanvirus लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारीच राज ठाकरे यांच्या दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर आता कोरोना व्हायरसने थेट राज ठाकरे यांच्या घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे कृष्णकुंजवर सध्या चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या आधी राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने हे सुरक्षारक्षक कोरोना मुक्त झाले. पण आता राज यांच्या घरात काम करणाऱ्या दोघांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दादरच्या शिवाजी पार्क परिसरात राज ठाकरे यांचे कृष्णकुंज हे निवासस्थान आहे. दादर, माहीम आणि धारावी हा परिसर पालिकेच्या जी नॉर्थ या वॉर्डात येतो. काही दिवसांपूर्वी या वॉर्डात मोठ्याप्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडत होते. मात्र, आता कोरोनाचा मुख्य हॉटस्पॉट असलेल्या धारावीतील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र, माहीम आणि दादर परिसरात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजपासून काही अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन करण्यात आले होते. तसेच शिवसेना भवन एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”