व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मोदी- अदानी भाई भाई!! राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणावेळी विरोधकांचा गदारोळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी- अदानी भाई भाई…. अशी नारेबाजी करत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आज राज्यसभेत मोदींचे भाषण सुरु असतानाच विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभागृहात गदारोळ घातला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उत्तर देत होते त्यावेळी अदानींच्या मुद्यावरून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला.

नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात करताच विरोधी बाकावरील खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात सुरुवात केली. मोदी- अदानी भाई भाई… अशी नारेबाजी विरोधक देऊ लागले. त्यानंतर मोदींनी सुद्धा आपल्या खास शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. विरोधकांकडे चिखल आहे पण माझ्याकडे मात्र गुलाल आहे. तुम्ही जितकी जास्त चिखलफेक कराल तेवढे जास्त कमळ फुलणार असं प्रत्युत्तर मोदींनी दिले.

काँग्रेसने ६० वर्षात खड्डेच खड्डे केले होते. पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या सरकारने अनेक उपाययोजना केल्या. सामान्य माणसाचा पैसा चुकीच्या हातात जाण्यापासून आम्ही वाचवला. जन धन योजनेतून ३२ कोटी गरिबांची बँक खाती उघडली. आणि जनतेने विरोधकांची खाती बंद केली असा टोला मोदींनी लगावला. काँग्रेस ‘गरीबी हटाओ’ म्हणायचे, पण ४ दशकांहून अधिक काळ त्यानी काहीही केले नाही. देशातील लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत असं मोदी यावेळी म्हणाले.