अरेरे ! कोरोना वॉरियर्ससाठीची विमा योजना मोदी सरकारने केली बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारने कोरोना वॉरियर्ससाठीची विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्य सरकारांना पत्र लिहून याबाबतची माहिती दिली आहे.

आरोग्य सचिवांनी हे पत्र २४ मार्च रोजी लिहिले होते. हे पत्र आता समोर आले आहे. केंद्र सरकारने गेल्यावर्षी पंतप्रधान गरीब कल्याण पँकेज अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना सुरू केली होती. याअंतर्गत कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांपर्यंत विमा कवच देण्यात आले होते. या ड्यूटीदरम्यान कुठल्याही आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांपर्यंत विमा सुरक्षा मिळत होती.

२४ मार्च रोजी राज्यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले की, ही योजना सुरुवातीला ९० दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र नंतर तिचा कालावधी वाढवून २४ मार्च २०२१ पर्यंत करण्यात आला होता. या पत्रात या योजनेला मुदतवाढ देण्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजना २४ मार्च २०२१ मध्ये समाप्त झाली आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाने ट्विट करून या योजनेंतर्गत २४ एप्रिल २०२१ पर्यंत क्लेम करता येईल, असे सांगितले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्यावर्षी २६ मार्च रोजी या योजनेची घोषणा केली होती. सुरुवातीला ही योजना ९० दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र नंतर तिचा अवधी वाढवून २४ मार्च २०२१ करण्यात आला होता. या योजनेमधून सरकारी डॉक्टरांसोबत खाजगी डॉक्टरांनाही संरक्षण देण्यात आले होते.

You might also like