“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अटक करा” : रुपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर रात्रीच्या ११.३० च्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट पोलीस स्टेशनला पोहचले. त्याठिकाणी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

पुण्यातील पत्रकारांसोबत रुपाली चाकणकर यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी सांगितले.

तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या असंवेदनशील आणि बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. राज्य सरकारांनी ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवावं अस या महाशयांचं म्हणणं आहे. आम्ही काय मौज मजेसाठी ऑक्सिजन मागतोय का? ऑक्सिजनच्या अभावी आमची मायबाप जनता मरणयातना भोगत आहे म्हणून आम्ही ऑक्सिजन मागतोय, तेही तुम्ही देऊ शकत नसाल तर असं सरकार आपल्या देशात काय कामाचं? कोरोनावर नियंत्रण मिळवणं राज्यांची जबाबदारी आहे असंही या मंत्री महोदयांचं म्हणणं आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवणं जर राज्यांची जबाबदारी आहे तर मग केंद्राची काय जबाबदारी आहे? केवळ राज्यांमध्ये निवडणुका लावणं आणि गल्लोगल्ली प्रचार करत हिंडणं एवढंच काम आहे का केंद्र सरकारचं? असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.

आमचा लढा आम्ही लढू. इंजेक्शन, लस , व्हेंटिलेटर्स अशा संसाधनांवर असलेल केंद्र सरकारचं नियंत्रण ताबडतोब रद्द करा, केंद्राकडे गेल्या कित्येक महिन्यापासून असलेली महाराष्ट्राची उधारी ताबडतोब चुकती करा. आमचा महाराष्ट्र हे आव्हान पेलायला समर्थ आहे. आमच्या मराठी भाषेत एक म्हण आहे “भीक नको पण कुत्रं आवर” याच पार्श्वभूमीवर “मदत नको, पण तुमच्या वाचाळ मंत्र्यांना आवरा” अशी पंतप्रधानांना विनंती आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

Leave a Comment