हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार शरद पवार यांनी आज सातारा येथे शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाच राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला आहे. यापेक्षा वेगळा निकाल लागेल. अशी माहिती आमच्याकडे नव्हती. मात्र, महाराष्ट्रात भाजप – युतीची सत्ता येणार नाही असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आणि आज अजित पवार जे मोदींविषयी बोलत आहेत त्यामागचे कारण म्हणजे त्याची भाजपशी झालेली जवळीक हे आहे. सातारा जिल्ह्यात आम्ही लोकसभेचा उमेदवार उभा करणार असून निवडून देखील आणणार असल्याचा विश्वास खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहात खा. शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, आम्ही इंडिया आघाडीची बैठक बोलवली आहे. त्यामध्ये आजच्या निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा करणार आहोत. मात्र, या निकालाचा काहीच परिणाम इंडिया आघाडीवर होणार नाही. राजस्थान मध्ये काँग्रेस ५ वर्षे सत्तेत होती. दोन राज्यात भाजपची सत्ता होती. तिथं त्यांनी अधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. मुख्यत: राजस्थानचा मुद्दा आहे. मागची पाच वर्षे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे आता नव्या लोकांना संधी द्यावी, असा मूड राजस्थानच्या जनतेचा दिसतो. त्याला साजेसा असा निकालाचा सुरुवातीचा कल दिसतो आहे.
४ राज्यांपैकी ३ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला अनुकूल निकाल दिसतोय. संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. पण सध्या इंडिया आघाडीसमोर मोदींना कोण पर्याय असेल, हाच विषय आमच्यासमोर आहे. या निवडणुकीचा लोकसभेच्या निकालांवर काहीही परिणाम होणार नाही. राजस्थानमध्ये पाच वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. तिथे नवीन लोकांना सत्ता द्यावी, असा जनतेचा मूड होता. दुसरीकडे तेलंगणात सत्ताधाऱ्यांना साजेशाच मूड असतो, असं नेहमी दिसतं. पण यंदा राहुल गांधी यांची हैदरबादमध्ये सभा झाली, तिथला गर्दीचा उच्चांक बघून आम्हा लोकांची खात्री झाली की यंदा तेलंगणात सत्ताबदल होईल, असा आवर्जून उल्लेख शरद पवार यांनी केला. त्याचवेळी ३ राज्यांच्या निवडणुकीत भाजपला अनुकूल निकाल दिसत असल्याचे पवार यांनी म्हंटले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/733045262031621
मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं : पवार
सातारा येथे शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेवेळी खा. शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मागणी केली. मराठा समाजाला आरक्षण हे या सरकारने दिले पाहिजे. जातीनिहायक जनगणना व्हावी तसेच इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी आमची भूमिका आहे. इतरांच्या ताटातल काढून न घेता मराठा समाजाला न्याय द्यावा. अधिवेशनात आरक्षणावर काय चर्चा होईल यावर आमचं लक्ष असेल, असे पवार यांनी म्हंटले.
तोवर ईव्हीएम यंत्रणेला मी दोष देणार नाही…: शरद पवार
जिथं काँग्रेसचा पराजय झाला तिथं काँग्रेस नेते हा ईव्हीएमचा विजय असल्याचं म्हणत आहेत. हा मुद्दा माझ्याही कानावर आला आहे. पण या सगळ्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत या सगळ्याची विश्वासार्ह माहिती माझ्यापर्यंत येत नाही. तोवर सबंध यंत्रणेला मी दोष देणार नाही, असे शरद पवार यांनी म्हंटले.