मुंबई । कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. राज्यात अंतर्गत प्रवासावर निर्बंध घालत जिल्हा बंदी करण्यात आली. अशा परिस्थितीत मुंबई, पुण्यासारख्या शहरात नोकरी, कामधंदा, शिक्षणासाठी आलेले महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिक अडकून पडले. दरम्यान आता मुंबई, पुण्यासारख्या विविध शहरांमध्ये अडकून असणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. शासनाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता राज्यातच विविध ठिकाणी अडकलेल्या मंडळींनाही घरी जाता येणार आहे. विशेष म्हणजे या मंडळींना त्यांच्या गावी पोहोचवण्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. याकरता लाल परी, अर्थात एसटीची मदत घेतली जाणार आहे.
राज्यात विविध ठिकाणी असणाऱ्या लोकांना त्यांच्या गावांच्या दिशेने पाठवण्यासाठी जवळपास १० हजार एसटी बस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मदत व पुनर्वसन विभाग यासाठीचा खर्च उचलणार आहे. राज्यात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी २० कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी याबाबतची माहिती दिली. तेव्हा आता महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी एसटीने मोफत जाता येणार.
येत्या दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. ज्यामध्ये राज्यातील मुंबई पुण्यासह सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गलेले लोक असतील या सर्वच लोकांना आपल्या घरी जाता येणार आहे. मुख्य म्हणजे कोरोनासाठीची आवश्यक चाचणी करुनच नागरिकांना पुढच्या प्रवासाला जाता येणार आहे. पण, अपेक्षित स्थळी त्यांना प्रवेश मिळणार का, हाच महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रवासासाठी सरकारकडून नियमावलीही जारी करण्यात येणार आहे. एकीकडे परराज्यातील मजुरांना ट्रेनमधून पाठवताना ट्रेनच्या तिकिट शुल्काच्या मुद्द्यावरून वाद सुरु असतानाच राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकार स्वतः तिकिटांचा भार उचलणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांत अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून १० हजार एसटी बसेसमार्फत मोफत सेवा देण्याचा निर्णय. याबाबत सांगताहेत मदत व पुनर्वसन मंत्री @VijayWadettiwar pic.twitter.com/d2OnK7Xce2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 6, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.’