Tuesday, June 6, 2023

राणेंनी वाघाला घाबरूनच म्यॉव म्यॉव आवाज काढला; किशोरी पेडणेकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस पार पडला. अधिवेशनाच्या पहिला दिवस भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदींची केलेली नक्कल तर दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर म्यॉव म्यॉव असा आवाज काढत साधलेला निशाणा. राणेंच्या या म्यावम्याववरुन अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एका फोटोद्वारे उत्तर दिले. त्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणेंना टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे हे वाघच आहेत. त्यामुळे त्यांना घाबरून राणेंनी मांजरींनीचा आवाज काढला, असे पेडणेकर यांनी म्हंटले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी काढलेल्या आवाजावर टोलेबाजी केली. यावेळी त्या म्हणाल्या की, भाजप नेते नितेश राणे यांनी जो म्याव म्याव आवाज काढला. त्यांच्या आवाजाला कोणीही प्रतिसाद दिला नाही. याचा एकच अर्थ होतो तो म्हणजे सुसंस्कृत व असंस्कृत होय. या दोन्ही गोष्टी त्यावेळी त्या ठिकाणी दिसल्या. आदित्य ठाकरे तसेच प्रत्येक शिवसैनिकाला शिवसेनेचा वाघ असच म्हंटल जात. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना बघून जर नितेश राणे यांना भीती वाटली असेल तर पटकन एक प्रतिक्रिया राणेंनी दिली असणार यात शंका नाही, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?

भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. परीक्षा घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवर घोषणा देत होते. काय म्हणाले दादा, ठाकरे सरकार शोधून आणा… अशा घोषणा विरोधक देत होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसत होते.