व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबईकरांनो, मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठा बदल; घरातून निघताना ट्रॅफिकची माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. यावेळी ते मुंबईतील अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत. मुंबईत मोदींची जाहीर सभाही होणार आहे. मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आजच्या दिवशी घरातून बाहेर पडताना ट्राफिक बद्दल माहिती घेणं आवश्यक आहे.

घाटकोपर- वर्सोवा मेट्रो आज संध्याकाळी 5.45 ते 7.30च्या दरम्यान बंद राहणार आहे. बीकेसी आणि गुंडवली मेट्रो स्थानक येथील सार्वजनिक कार्यक्रमामुळे सव्वा चार ते साडे पाच या वेळेत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर दक्षिण वाहिनी (कुलाबाकडे) तसेच 5.30 ते- 5.45 या वेळेत उत्तरवाहिनी (दहिसरकडे) वाहतूक संथ गतीने सुरू असेल.

वांद्रे-कुर्ला संकुल येथे आयोजित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर १९ जानेवारी, २०२३ रोजी दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत पश्चिम द्रुतगती मार्ग व पश्चिम उपनगरातील रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी वरळी सी लिंककडून बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने एमएमआरडीए जंक्शन येथून धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे तसेच पूर्व द्रुतगती मार्गाकडे मार्गस्थ होतील.

संत ज्ञानेश्वर मार्गावरुन आयकर विभाग जंक्शनकडून पुढे बीकेसी परिसर कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने गुरुनानक रुग्णालयाजवळ जगत विद्यामंदिर जंक्शन येथून कलानगर मार्गे सरळ पुढे धारावी टी जंक्शनवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

खेरवाडी शासकीय वसाहत मनाकिया पॅलेस, वाल्मिकी नगरकडून पुढे बीकेसी परिसर, चुनाभट्टी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी वाहने, वाल्मिकी नगर येथून यू टर्न घेऊन शासकीय वसाहत मार्ग कलानगर जंक्शन येथून सरळ पुढे धारावी टी जंक्शन पुढेवरुन कुर्ल्याकडे मार्गस्थ होतील.

तसेच सूर्वे जंक्शन आणि रजाक जंक्शनवरुन पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी, वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहने सुर्वे जंक्शन, रजाक जंक्शन, एमटीएनएल जंक्शन येथून सीएसटी रोडने मुंबई विद्यापीठ मेनगेट, आंबेडकर जंक्शन, हंसमुखा जंक्शन येथून पुढे इच्छितस्थळी मार्गस्थ होती.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळेल. मुंबई पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच पाच पोलीस उपायुक्त या दौऱ्यावेळी तैनात राहणार आहेत. त्यांच्यासोबत 27 एसीपी, 171 पोलीस निरीक्षक आणि 397 अधिकारी तैनात राहणार आहेत. जवळपास 2500 पोलीस तैनात राहणार आहेत. त्यात 600 महिला पोलिसांचा समावेश आहे.