Mumbai Trans Harbour Link : रोज 30,000 वाहनांचा प्रवास, 61 लाख रुपये महसूल होतोय जमा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Trans Harbour Link : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरून दररोज ३० हजाराहून अधिक वाहने प्रवास करत आहेत. तसेच टोलच्या माध्यमातून या सागरी सेतूमुळे दररोज तब्बल 61 लाख रुपयांचा महसूल सुद्धा जमा होतोय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA ने याबाबत माहिती दिली आहे. महत्वाचे म्हणजे या सागरी सेतूचे लोकार्पण होऊन अवघे १५ दिवसच झाले आहेत, त्यामुळे खूपच कमी कालावधीत या सागरी सेतूला मुंबईकरांची पसंती मिळाल्याचे दिसत आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १२ जानेवारीला मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (Mumbai Trans Harbour Link) उदघाटन केलं होते. या सागरी सेतूला अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे. MMRDA ने दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारीला एकूण 28,176 वाहनांनी अटल सेतूचा वापर केला आणि 54.77 लाख रुपयांची कमाई झाली तर दुसऱ्या दिवशी एकूण 54,977 वाहनांनी पुलाचा वापर केला आणि टोलद्वारे 1.06 कोटी रुपये कमावले. दररोज सरकारी ३० हजाराहून अधिक वाहने या सागरी सेतूवरून प्रवास करत असून 61 लाख रुपयांचा महसूल रोज जमा होतोय.

कसा आहे टोल – Mumbai Trans Harbour Link

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर, शिवडी ते चिर्ले, नवी मुंबई या संपूर्ण मार्गासाठी 250 रुपये टोल आकारण्यात आला आहे. तर शिवडी ते शिवाजी नगर, नवी मुंबईसाठी टोल 200 रुपये आहे. प्रवासी गाड्यांसाठी परतीचा प्रवास 300 रुपये, रोजचा पास 500 रुपये आणि महिन्याचा पास 10,000 रुपये आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Mumbai Trans Harbour Link) हा 21.8 किलोमीटर लांबीचा 6 लेन रोड ब्रिज आहे. यातील 16.5 किलोमीटर अंतर प्रवास हा समुद्री ब्रिज वरून करावा लागतोय तर 5.5 किलोमीटर प्रवास हा जमिनीवरून आहे. हा सागरी सेतू मुंबई ते नवी मुंबईला जोडत असून तुम्ही अवघ्या २० मिनिटात मुंबईतून नवी मुंबईत जाऊ शकता, यापूर्वी हे अंतर पार करायला तब्बल २ तासांचा वेळ लागत होता. हा अटल सेतू मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. तसेच यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतातील प्रवासाचा वेळही कमी होईल.