हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड एकेकाळची सुंदर अभिनेत्री म्हणजे मधुबाला जिची आज पुण्यतिथी आहे. अनेक दशके लोटली तरी आजही तिचे लाखो चाहते आहेत. मधुबालाची सिनेमाची जादू आजही लोकांना तिच्याकडे आकर्षित करते. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी ती या जगापासून दूर गेली. 23 फेब्रुवारी 1969 रोजी हृदयविकारामुळे तिचे निधन झाले. इतर नायिकांप्रमाणेच तिचेही अनेक प्रेमी होते, पण मधुबालाचा एक प्रियकर बाकीच्यांपेक्षा वेगळा होता. खरं तर एक तत्कालीन कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन मधुबालाच्या प्रेमात पडला होता.
बॉलिवूड आणि अंडरवर्ल्डमधील नातं तसं जुनं आहे. अनेक नायिकांचे नाव अशा अंडरवर्ल्ड डॉनशी जोडले गेलेले आहे. अबू सालेम-मोनिका बेदी, मंदाकिनी-दाऊद इब्राहिमच्या नात्यातील कथा सर्वश्रुत आहेतच. आता आपण येथे एका डॉनविषयी बोलणार आहोत जो मधुबालावर अक्षरशः मरत होता. त्याला काहीही करून मधुबाला हवी होती आणि त्यासाठी तो कोणत्याही थरास जाण्यास तयार होता. हा डॉन दुसरा कोणी नसून मुंबईचा एकेकाळचा प्रसिद्ध डॉन हाजी मस्तान हा होता.
हाजी मस्तानला मधुबाला खूप आवडत होती आणि तो तिच्यावर खुप प्रेम करायचा. मधुबालाशी लग्न करण्याचे त्याचे स्वप्न होते. एका मीडिया रिपोर्टनुसार या दोघांमध्ये मैत्री देखील होती. पण मधुबालावर आपले प्रेम तो कधीही व्यक्त करू शकला नाही. या डॉनने आपले प्रेम व्यक्त करण्यापूर्वीच मधुबाला या जगातून निघून गेली.
मधुबालाच्या मृत्यूने हाजी मस्तानला फार मोठा धक्का बसला. मधुबालावरील त्याचे प्रेम कधीच थांबले नाही. त्यावेळी चित्रपटसृष्टीत एक नवीन नायिका उदयास येत होती. तिचे नाव सोना होते. सोना अगदी मधुबालासारखीच दिसत होती. जेव्हा सोनाची चित्रपटांमध्ये एन्ट्री झाली तेव्हा असे वाटले की, मधुबाला परत आली आहे. त्या दोघींचा चेहरा आणि मोहरा खूपच मिळताजुळता होता. तीही मधुबालासारखीच हसायची. लहेजा असा की चित्रपटसृष्टीतील लोकंही अनेकदा फसायचे. मधुबालासारख्या दिसण्यामुळे हाजी मस्तानची सोनाशी असलेली जवळीक वाढू लागली. हाजीने सोनाच्या चित्रपटात बराच पैसा गुंतवला मात्र तिचे चित्रपट चालू शकले नाहीत.
हाजीचे आधीपासूनच लग्न झाले होते, परंतु त्याचा हाजी आणि सोनाच्या नात्यावर कधीही परिणाम झाला नाही. असे म्हटले जाते की, हाजी मस्तानने कधीही कोणावर गोळीबार केला नाही, परंतु आपल्या शैलीने त्याने आपला प्रभाव कायम ठेवला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.




