हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी छत्तीसगड रायपुर येथे धर्मसंसदेत कालिचरण बाबाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याची माहिती सभागृहास दिली. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मलिकांवर निशाणा साधला. “खरे तर मलिकांनी माफी मागितली पाहिजे. कारण या राज्यात महात्मा गांधी यांचा अवमान झाल्यानंतर सरकार हातावर हात ठेऊन बसत आहे. तुम्ही आतापर्यंत का कारवाई केली नाही? असा सवाल मुनगंटीवार यांनी मलिक यांना विचारला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मलिकांनी केलेल्या मागणीनंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत मत व्यक्त केले. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, कालिचरण बाबावर कारवाई करण्याची मागणी योग्यच आहे. मलिक हे स्वतः मंत्री आहे. खरं तर मात्र, त्या कालिचरणबाबावर मलिकांनी का कारवाई केली नाही? ते एक मंत्री आहेत. त्यांनीच आज सभागृहाची माफी मागायला हवी. पंधरा हजार कोटी रुपये पोलिसांवर खर्च केला जात आहे.
राज्य सरकारने व पोलिसांनी टीका करणाऱ्या अशा प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई का केली नाही. तुम्हीच अशा प्रकारच्या लोकांचे पालन पोषण केले आहे, असा आरोप यावेळी मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. मुनगंटीवार यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या टीका करणाऱ्या बाबावर तत्काळ पोलिसांकडून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.