तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Narayan Rane Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सभा घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. राज ठाकरेंवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुन्नाभाई चित्रपटाची आठवण करुन दिली. यावरुन आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “केमिकल लोचा ही मुख्यमंत्र्यांची सुसंस्कृत भाषा. तुम्हाला मांडीला मांडी लावून नवाबभाई चालतात पण मराठीत मुन्नाभाई नाव असले तर चालत नाहीत, अशी टीका राणेंनी केली आहे.

मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पन्नास ते पंचावन्न वर्षे मुंबईत दुकान कोणी चालवले? महाराजांच्या नावाने कोणी पैसे गोळा केले? असे अनेक प्रश्न आहेत. महाराजांचे नाव घ्यायचे आणि हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या? याला काय अर्थ आहे. यांना नवाबभाई चालतात कारण त्यांचा दाऊदशी संबंध आहे. १९९१ पासून आम्हाला जे संरक्षण आहे ही त्यांची कृपा आहे. दाऊदजा संबंध भाजपासोबत जोडायचा. आमचा काय संबंध दाऊदशी. केंद्र सरकारने सगळ्या कारवाया केल्या आहेत, असे नारायण राणे म्हणाले.

आमचा दाऊदशी काय संबंध आहे आम्ही सर्व कारवाया केलेल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले कि, काही लोकांना संरक्षण देण्याबद्दल ते बोलले. पण चुकीच्या माणसाला दिले आहे का? १९९१ पासून मला सुरक्षा देण्यात आली आहे. उद्धवजी अजून १० वर्षे जरी मुख्यमंत्री असलात तरी नारायण राणेंनी आठ महिन्यात केलेल्या कामाची बरोबरी होऊ शकणार नाही. चेष्टा, विनोद करणे सोपे आहे. हे शिव्या संपर्क भाषण आहे. सभेमध्ये फेरीवाले आणून बसवले होते. त्यांचा शिवसेनेशी संबध काय होता? असा सवाल यावेळी राणेंनी केला.

गेल्या अडीच वर्षात किती चुली पेटवल्या?

यावेळी मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारत त्यांच्यावर प्रहार केला. यावेळी राणे म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी किती जणांच्या चुली पेटवल्या हे सांगावे? तुम्ही चुली पेटवणारे नाही तर चुली उद्धस्त करण्याचे काम केले आहे. तुम्ही मराठी तरुणाच्या हातात दगड दिले अशा उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणण्याची लाज वाटते, अशी टीका राणे यांनी केली.