उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट; नवनीत राणांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून टीका केली जात असल्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज एमएमआरडीए मैदान वांद्रे पूर्व येथे जाहीर सभा होणार आहे. मात्र, तत्पूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व रवी राणा यांनी नवी दिल्लीतील प्राचीन मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि महाआरती केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट कोणते असेल तर ते उद्धव ठाकरे हे आहेत. आणि महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे, अशी टीका राणा यांनी केली आहे.

नवनीत राणा व रवी राणा यांनी आज दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या की, आज आमही जी हनुमान चालीसा पठण करत महाआरती करणार आहोत. तो महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंच्या रूपाने असलेले संकट दूर करण्यासाठी होय.

यावेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यानी राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेवरून त्याच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, संभाजी महाराजांची आज जयंती आहे. त्याचवेळी त्यांच्याविरोधात हार अर्पण केले जात असतील तर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री कुठे गेले हा माझा त्यांना प्रश्न आहे. हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे तर कबरीवर फुले अर्पण करण्याला काय म्हणाल?,” असा सवाल राणा यांनी यावेळी केला आहे.

हिंमत असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्याचे दात तोडून दाखवा

यावेळी नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले. त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांनी मला वज्र द्या मी दात तोडण्याचे काम करेन, असे सांगितले आहे. मात्र, त्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की, माझ्या महाराष्ट्राच्या जनतेचे दात तोडण्याची गरज नाही. जर दात तोडायचे असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन फुले अर्पण करणाऱ्यांचे तोडून दाखवा. तेव्हाच तुमच्यात हिंदुत्व जिवंत आहे, यावर आमचा विश्वास बसेल,असे आव्हान नवनीत राणा यांनी दिले.