हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये गेल्यापासून राष्ट्रवादी पक्षाची विभागणी दोन गटात झाली आहे. आता हा पक्ष नेमका कोणाचा यावर न्यायालयात वाद देखील सुरू आहे. दरम्यान, याकाळातच शरद पवार यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांनी बाहेर येतात शरद पवारांकडे पाठ वळवली असल्याचे आता म्हणले जात आहे.
मनी लॉन्ड्रीग प्रकरणात न्यायालयाने नवाब मलिक यांना कारावासाची शिक्षा सुनावली होती. मधल्या काळात जेव्हा राष्ट्रवादीत फुट झाली त्यावेळी नवाब मलिक यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू होते. यानंतर काही दिवसातच नवाब मलिकांना 50 हजारांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने 14 ऑगस्ट रोजी जामीन दिला. त्यामुळे बाहेर आल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात जातील हा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र मी कोणत्याही गटात जाणार नाही, मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार असे नवाब मलिक यांच्याकडून सांगण्यात आले होते.
दरम्यान आता नवाब मलिक यांच्या सुटकेला दीड दोन महिने उलटून गेले आहेत. त्यांच्या अजित पवार यांच्यासोबतच्या गाठीभेटी देखील वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच लवकरच नवाब मलिक अजित पवार गटात जातील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला नवाब मलिक यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु अद्याप खुद्द नवाब मलिक यांच्याकडून ते नेमके कोणत्या गटात जाणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. यामुळेच राष्ट्रवादीत पडलेल्या दोन्ही गटांविषयी नवाब मलिक यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.