हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय जनता पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. ज्या राज्यात सत्ता नव्हती त्या राज्यातही सत्ता आणली गेली असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्ली यथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पवारांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.
शरद पवार म्हणाले, देशातील अनेक राज्यात भाजपची सत्ता नव्हती, पण सत्ता नसलेल्या राज्यात सत्ता आणली गेली. महाराष्ट्रात भाजपची हुकुमत नव्हती. मात्र शिवसेनेचे आमदार गेल्याने महाराष्ट्रात भाजपची हुकुमत आली, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. केंद्र सरकार ईडी, सीबीआय याना हाताशी धरून काम करत आहे असा आरोप पवारानी केला.
यावेळी त्यांनी संजय राऊत, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई वरूनही भाजपवर निशाणा साधला. संजय राऊत सरकार विरोधात लिहितात म्हणून त्यांच्यावर कारवाई केली. गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांना अटक करून त्यांच्यावर 100 कोटींचा आरोप करण्यात आला. नंतर ती रक्कम 4 कोटी झाली, नंतर 1 कोटी झाली. नवाब मलिक यांची तरी काय चूक ? 20 वर्षांपूर्वी काही व्यवहार झाला होता. तरी त्यांच्यावर कारवाई केली असा आरोप पवारानी केला.