हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली आहे. दरम्यान विरोधी पक्ष भाजपने कोरोनासाठी मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला जबाबदार धरले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक कविता सादर करत भाजपला जोरदार टोले दिले आहेत.
खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!
कधी थाळ्या वाजवायला
लावल्या नाही…
ना कधी मेणबत्या आणि दिवे
लावायला लावले …..
निर्णय घेताना घेतले
विश्वासात…..
विरोधकांचे त्यामुळेच
फावले…….
शांत राहून तो लढत आहे
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
मंदिर उघडा, बाजार उघडा
शाळा उघडा ते म्हणाले…..
परीक्षा पुढे ढकलल्या तर
ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….
कोरोना वाढला तर ते आता
फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
इमान तर विकले नाहीच
ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..
कोरोनाचे आकडे लपवले नाहीच
खोट्याने न कधी माना झुकल्या….
घरी पत्नी आणि मुलगा
आजारी असतांना तो मात्र लढत आहे….
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
ना कुठे बडबोले पणा
ना कशाचा बडेजाव..
आठ हजार कोटीचे
विमान नको….
ना कोणत्या प्रकरणात
घुमजाव……
जे करतोय ते प्रामाणिक पणे
तो करतो आहे…..
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…
विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….
गोर गरीब जनतेला
एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….
निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट
शेतकऱ्यांच्या अडचणी
साठी तो शांततेत लढतो आहे ……
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!
ना क्लीन चिट देता आली…
ना खोटी आकडे वारी देता आली…
निवडणूक काळात तर कधी
ना अशक्य घोषणा त्याला करता आली…
जे होण्यासारखे आहे तेच तो करतोय…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
महाराष्ट्राचे मीठ खाऊन
निधी पंतप्रधान निधीला ते देताय…
उठ सूठ, सकाळ संध्याकाळ
ते टीका सरकार वर करताय…..
तो मात्र टिकेला उत्तर न देता
सर्वसामान्यांसाठी झटत आहे…
विरोधकांचे खरंच राईट आहे….
खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!
– डॉ.जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी उपरोधिक शैलीत ही कविता लिहिली असून त्यातून त्यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टाळ्या, थाळ्या वाजवण्यास, मेणबत्या, दिवे पेटवण्यास सांगितले नाही. ते शांतपणे लढत आहेत. विरोधक मात्र कोरोना संकटातही मंदिर उघडा, बाजार उघडा असं सांगून रस्त्यावर उतरले होते, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचं निमित्त साधून सरकारी कंपन्या विकल्या नाहीत आणि कोरोनाचे आकडेही लपवले नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. कोणताही निर्णय घेताना मुख्यमंत्री सर्वांशी संवाद साधत आहेत. व्यापाऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचं ऐकून घेऊनच निर्णय घेत आहेत. मग हा मुख्यमंत्री खरंच वाईट आहे का? असा सवालच आव्हाड यांनी केला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page