भाजप याआधी धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, मंत्र्यांची बदनामी करण्याची त्यांना सवय लागलीये- हसन मुश्रीफ

कोल्हापूर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर आता राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भाजपवर निशाणा साधलाय. भाजप धनंजय मुंडे प्रकरणात तोंडघशी पडलंय, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भाजपला महाविकासआघाडीच्या मंत्र्यांची बदनामी करण्याची सवय लागल्याचा आरोप केला. ते कोल्हापुरात बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्यावेळी देखील असंच झालं होतं. धनंजय मुंडे यांच्या वेळी भाजप तोंडघशी पडले आहे. या प्रकरणाचीही चौकही झाली पाहिजे आणि त्यातूनच सत्य समोर येईल. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना बदनाम करायची भाजपला सवय लागलीय. भाजप सत्ता यावी म्हणून काहीही आरोप करत आहे. त्यांचा अनेकदा भ्रमनिरास झालाय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होऊन शहानिशा झाली पाहिजे. एखाद्या माणसाला बदनाम करणं हे काही योग्य नाही.”

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सदर प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

You might also like