Wednesday, February 8, 2023

ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झालीय; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे एनसीबीच्यावतीने तर दुसरीकडे ईडीच्यावतीने राज्यात कारवायांचे धाड सत्र सुरु आहे. या धाड सत्रावरून काँग्रेस नेत्या तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी ईडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राज्यात ईडीच्या कारवाईबाबत सांगायचे झाले तर ईडीची आता पान-तंबाखूच्या दुकानासारखी गत झाली आहे. आणि पंतप्रधानाच्या डोक्यात तर सत्तेचा मगरुरपणा शिरला आहे,” अशी घणाघाती टीका शिंदे यांनी केली आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात माध्यमसनही संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, आजच्या काळात ईडीच्या विरोधात बोललं तर उद्या माझ्याही घरी ईडीचे लोक येतील. ईडीचे लोक कोणाच्याही घरी जातात आणि त्यांना चौकशीसाठी उचलतात. पंतप्रधान आणि भाजप वाल्यांकडून देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे कारस्थान केले जात आहे.

- Advertisement -

देशाच्या पंतप्रधानाच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्यांच्या डोक्यात सत्तेचा मगरुरपणा शिरलेला आहे. त्यांना सत्ता मिळाली बास झाले. त्यांना आता काही फरक पडत नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या अंगावर बुलडोझर फिरवतात आणि दुसरीकडे बिनधास्तपणे उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जातात. त्यांना लाज लज्जा वाटत नाही. सत्ता मिळाली की अधिक आपुलकीने काम करायला पाहिजे. मात्र, आपल्या देशाचे पंतप्रधानच इतके मगृर आहेत. त्यामुळे इकडचे लोकही तसेच झाले असल्याची टीका शिंदे यांनी केली.