हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आज भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने वादग्रस्त टिप्पणी केली. त्याने केलेल्या टिप्पणीनंतर त्याला पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. दरम्यान यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असतीर तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असे विधान चव्हाण यांनी केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर आज भाजप पदाधिकारी जितेन गजारिया याने वादग्रस्त पोस्ट केल्याच्या घटनेचा राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने राबडीदेवीचं उदाहरण दिलं असेल तर रश्मी ठाकरे खूप नशीबवान आहेत. कारण ती घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री होती. तिला बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचं भाग्य मिळालं.
बरं झालं फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाही तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी म्हणून ओळख असलेल्या रश्मी ठाकरे यांची समाजात वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपमधील लोकांना सांगायचे आहे, असे चव्हाण यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.
काय आहे प्रकरण?
जितेन गजारीया याने रश्मी ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केले होते. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या पोलिसांची जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. जितेन गजारीया हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे. त्याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती.