राष्ट्रवादी काँग्रेसचा प्लॅन ठरला : नागपूर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काढणार 1 लाख लोकांचा मोर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर येथे 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न, पिकविम्याचा मुद्दा, महागाई आणि राज्यपालांची सततची वादग्रस्त विधाने या मुद्द्यावरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जाणार आहे. सरकारला घेराव घालण्यासाठी राष्ट्रवादीने हा प्लॅन आखला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनावर तब्बल 1 लाख लोकांचा मोर्चा काढून शिंदे-फडणवीसांना विविध प्रश्नांवरुन लक्ष्य केले जाणार आहे.

यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्यात येत आहे. 19 डिसेंबरला अधिवेशन सुरु होईल. गेल्या चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले.शिंदे-फडणवीस सरकारला आता जवळपास चार महिने उलटून गेलेत. मात्र, ओला दुष्काळाचा मुद्दा, पीक विम्याचा प्रश्न, महागाई, राज्यपालांची विधाने, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार यावरुन विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे.

अधिवेशनादिवशी राष्ट्रवादीतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले की, नव्या सरकारच्या कामावर राज्यातील जनता नाराज आहे. याचमुळे सरकारविरोधात जनतेमध्ये मोठा रोष आहे. हाच रोष व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान भवनावर मोर्चा काढण्याचं नियोजन केलेले आहे. त्यानुसार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात लाखो लोकांच्या साक्षीने हा मोर्चा निघणार आहे.