हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बडे नेते सरकारी यंत्रणेच्या रडारावर असतानाच आता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammed Faisal) यांना कोर्टाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने फैजल यांच्यासह एकूण 4 जणांना दोषी ठरवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. मोहम्मद फैजल हे महारष्ट्राबाहेरील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत.
माजी केंद्रीय मंत्री पीएम सईद यांचे जावई पदनाथ सालीह यांच्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप मोहम्मद फैजल यांच्यावर होता. या हल्ल्यात मोहम्मद सालीह जबर जखमी झाला. 2009 साली याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत वकिलाने सांगितले की, 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राजकीय प्रकरणावरून मोहम्मद फैजल आणि त्यांच्या साथीदारांनी पदनाथ सालीह यांच्यावर हल्ला केला. त्यांनतर कोर्टाने आता निकाल दिला आहे. या प्रकरणात सय्यद मोहम्मद नूरुल अमीन आणि फैजलचे भाऊ मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद बशीर थंगल हे दोषी ठरलेले आहेत. न्यायालयाने दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
दरम्यान, आपल्याला राजकारणात गोवण्यात आले असून आपण या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार आहेत अशी प्रतिक्रिया मोहम्मद फैजल यांनी दिली आहे. फैजल हे लोकसभेचे विद्यमान सदस्य असून त्यांना 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली आहे. जर त्यांना केरळ उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही, तर त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ शकते.