सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले सध्या भाजपमध्ये जाण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी भाजपमध्ये देखील जोरदार तयारी सुरु असल्याचे बोलले जाते आहे. येत्या १ ते ५ सप्टेंबर च्या दरम्यान उदयनराजे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल होतील असे बोलले जाते आहे.
उदयनराजे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल होणार असल्याने त्यांची भाजपपुढे एक अट टाकली आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी विधानसभा निवडणुकी सोबतच लोकसभेची पोटनिवडणूक देखील घेण्यात यावी असे उदयनराजे भाजप नेत्यांना सांगत आहेत. तर भाजप नेते देखील या तांत्रिक बाबीला कायद्याच्या चौकटीत कसे बसवता येईल यावर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान विधानसभा निवडणुकी सोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होणार नसेल तर उदयनराजे आपल्या भाजप प्रवेशाच्या प्लॅनवर फेरविचार करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसोबत जर सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागणार नसेल तर मात्र उदयनराजे भाजपमध्ये नजाता राष्ट्रवादीत तटस्थ राहण्याची भूमिका बजावतील असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.